आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने आयोजित शिवस्वराज्य यात्रा जळगाव जिल्ह्यात असून जिल्ह्यातील चोपडा येथे शिवस्वराज्य सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत संविधान आर्मी संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून काही मागण्यांसाठी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या भाषणावेळीच घोषणाबाजी करण्यात आली.
advertisement
माजी आमदार संतोष चौधरी यांची हकालपट्टी करा
राष्ट्रवादीचे माजी आमदार संतोष चौधरी यांनी पक्षविरोधी कारवाया केल्या असून त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्याच्या मागणीसह भुसावळ विधानसभेची जागा पक्षाला सोडण्याच्या मागणीसाठी कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी खासदार अमोल कोल्हे यांनी संविधान आर्मी संघटनेचे अध्यक्ष जगन सोनवणे यांना व्यासपीठावर बोलवून मागण्यांसंदर्भात सविस्तर चर्चा केली, त्यानंतर जयंत पाटील यांनी विनाव्यत्यय मनोगत व्यक्त केले.
आमदार सांगतात हजारो कोटींची कामे केली पण मतदारसंघातली अस्वस्था तर फार वाईट आहे
जयंत पाटील म्हणाले, चोपडा मतदारसंघातील रस्त्यांची अवस्था वाईट आहे. पाडळसरे धरणाचा प्रश्न प्रलंबित आहे. धानोरा वीज प्रकल्प प्रलंबित आहे, शेतकऱ्यांसाठी वीज उपलब्धतेत अनियमिता आहे. त्यामुळे पिक उत्पादकता घसरते आहे. किनगाव येथे दवाखान्याचे काम पूर्ण झाले आहे, मात्र तो अद्याप सुरू झालेला नाही. सर्व स्तरातील लोकांमध्ये असंतोष आहे. तरीही इथेले आमदार म्हणतात की आम्ही हजारो कोटींची विकास कामे आणली. लोकांनी मोठ्या विश्वासाने त्यांना निवडून दिले. मात्र ते जळगावला राहतात आणि दहा दिवसातून एकदा येऊन एका दिवसात कामे निपटतात, असे लोकांचे म्हणणे आहे. हे वागणे एका लोकप्रतिनिधीला शोभत नाही.
अरुण गुजराथी ८३ वर्षी देखील थकलेले नाहीत, त्यांच्या मार्गदर्शनाखाली महा विकास आघाडीचा उमेदवार निवडून द्या
अरुण गुजराथी साहेब यांच्या नेतृत्वाखाली अनेक विकास कल्पना प्रत्यक्षात उतरवल्या आहेत. वयाच्या ८३ वर्षी देखील ते थकलेले नाहीत. सर्व जबाबदाऱ्या पूर्ण करत, युवकांना प्रोत्साहन देतात. त्यांच्या मार्गदर्शनाखाली महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून देण्याची जबाबदारी तुम्हा सर्वांची आहे, असे आवाहन जयंत पाटील यांनी शिवस्वराज्य यात्रेला उपस्थित जनतेला केले.
