जालना : खवले मांजराची तस्करी करणाऱ्या तब्बल सहा आरोपींना ताब्यात घेण्यात जालना वन विभागाच्या अधिकाऱ्यांना यश मिळाले आहे. यवतमाळ जिल्ह्यातील वन्यक्षेत्रातून खवले मांजराची तस्करी करून गुजरातमध्ये विक्री करण्याचा आरोपींचा प्लॅन होता. परंतु वन विभागाला खबऱ्यामार्फत माहिती मिळताच सापळा रचून वनविभागाने संबंधित तस्करांना तीन वाहनांसह ताब्यात घेतले आहे. विशेष म्हणजे वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्वतः ग्राहक बनून खबऱ्यांशी बोलणी केली. जालना शहरातील मंठा चौफुली परिसरात शुक्रवारी रात्री ही कारवाई करण्यात आली.
advertisement
खवले मांजर हा अतिशय दुर्मिळ प्राणी असून याची तस्करांमार्फत मोठ्या प्रमाणावर तस्करी केली जाते. या प्राण्यांना वन्यजीव अधिवासातून पकडून तस्कर देश-विदेशात मोठ्या रकमेला या प्राण्याची विक्री करतात. मंठा शहरातून हे आरोपी जालनाकडे येत असताना वनविभागाचे अधिकारी नागरगोजे आणि दौंड यांनी शिताफीने सापळा रचून तब्बल सहा आरोपी आणि तीन वाहनांना ताब्यात घेतले आहे. या आरोपींना न्यायालयात हजर करण्याची प्रक्रिया वन विभागाकडून करण्यात येत आहे. दरम्यान या टोळीचा आंतरराज्य टोळीशी संबंध असण्याची शक्यता देखील वन्यजीव संरक्षण अधिकारी सुदाम मुंडे यांनी व्यक्त केली.
पती आणि सासूने दिली साथ, ती बनली स्कूल व्हॅन ड्रायव्हर, सोलापूरच्या उज्वला यांची अनोखी कहाणी
गुप्त माहितीच्या आधारे जालना उत्तर कार्यक्षेत्रामध्ये श्रीजी हॉटेलच्या समोर तीन वाहने एक खवले मांजर घेऊन येत असल्याची माहिती आम्हाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे वन विभागाकडून सापळा रचण्यात आला. या कारवाईदरम्यान एक खवले मांजर, तीन वाहने आणि सहा आरोपींना पकडण्यात आले. वन्यजीव संरक्षण अधिनियम अंतर्गत आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. यानंतर वन्यजीव संरक्षण अधिनियमानुसार त्यांचा पुढील तपास करण्यात येईल. या टोळीचा आंतरराष्ट्रीय संबंध असण्याची देखील शक्यता नाकारता येत नाही, असं वन्यजीव संरक्षण अधिकारी सुदाम मुंडे यांनी सांगितलं.





