जालना जिल्ह्यातील एका तलाठ्याने तर भ्रष्टाचाराचा नवा तळ गाठला आहे. अपंग महिलेच्या अर्जावर सही करण्यासाठी मद्यधुंद अवस्थेत असलेल्या तलाठ्याने थेट बिअरबारात बोलावून फाईलवर सही करण्याआधी हॉटेलचे बिल भरण्याची अट घातली. ही धक्कादायक घटना भोकरदन तालुक्यातील जैनपूर कोठारा येथील असून संबंधित तलाठ्याचं नाव अगतराव वीर असं आहे.
गावातील सुनिता जाधव या अपंग महिलेनं नातेवाईकांच्या मदतीने इंदिरा गांधी राष्ट्रीय विकलांगता पेन्शन योजने अंतर्गत अर्ज केला होता. या अर्जावर तलाठ्याची सही आवश्यक असल्याने नातेवाईकांनी वीर यांच्याशी संपर्क साधला. मात्र, तलाठ्याने त्यांना थेट जवळच्या एका बिअरबारमध्ये बोलावलं. नंतर, मद्यधुंद अवस्थेतच अर्जदारांच्या नातेवाईकांना “सही करतो, पण आधी हॉटेलचं बिल भरा” अशी मागणी केली. शासनाच्या योजनेसाठी अर्ज केलेल्या एका अपंग महिलेचा अर्ज अशा पद्धतीने हाताळला गेल्याने ग्रामस्थांत तीव्र रोष निर्माण झाला आहे.
advertisement
या घटनेची माहिती समोर आल्यानंतर स्थानिक नागरिकांनी संताप व्यक्त करत संबंधित तलाठ्याच्या तात्काळ निलंबनाची मागणी केली आहे. शासनाने या गंभीर प्रकरणाची दखल घेऊन चौकशी सुरू करावी, अशी जोरदार मागणी होत आहे.