जालना: आपल्या कष्टांना प्रामाणिकतेची साथ मिळाली तर कोणतीही गोष्ट आपण मिळवू शकतो. हेच जालना जिल्ह्यातील शहागड येथील महेश चोथे या तरुणाने सिद्ध करून दाखवल आहे. तब्बल चार वेळा एमपीएससी परीक्षेत अपयश आल्यानंतरही खचून न जाता तितक्याच ताकतीने प्रयत्न करून महेशने पाचव्या प्रयत्नात यश खेचून आणले आहे. कधीकाळी पुस्तकांसाठी पैसे नसल्याने तेल विकून पैसे जमवणारा महेश आता सहाय्यक वाहतूक अधिकारी झालाय. लोकल18 सोबत बोलताना महेशने आपला संघर्षमय प्रवास सांगितला.
advertisement
जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील शहागड या छोट्याशा गावात ग्रामीण पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबात महेशचा जन्म झाला. पहिली ते दहावी पर्यंतचे शिक्षण त्याने गावातच पूर्ण केलं. यानंतर देवगिरी कॉलेज छत्रपती संभाजीनगर येथे त्याने बारावीपर्यंतची शिक्षण घेतले. पुढे इंजीनियरिंग करण्यासाठी तो पुणे येथे गेला. तिथेच त्याला लाभलेल्या मित्रांमुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा देण्याचा निर्णय त्यांनी घेतला.
MBA तरुणानं लावलं डोकं, 1 लाख पगाराची नोकरी सोडली अन् पाळल्या कोंबड्या, कमाई किती?
चारवेळा यशाची हुलकावणी
स्पर्धा परीक्षा करताना सुरुवातीला अनेक अडथळे आले, अडचणी आल्या. चार वेळा यशाने हुलकावणी दिली. परंतु, आपल्याकडून होत असलेल्या चुका तो प्रत्येक वेळी दुरुस्त करत गेला. शेवटी पाचव्या प्रयत्नात त्याला यश मिळालं. आपल्या घरात अधिकारी झाल्याने संपूर्ण कुटुंबाने जल्लोष केला.
लहानपणी विकलं तेल
लहानपणी अत्यंत बिकट परिस्थितीत महेशनं शिक्षण घेतलं. प्रसंगी पुस्तके घेण्यासाठी पैसे नसल्याने आजीबरोबर तेल विक्री केली. आलेल्या पैशातून पुस्तके व वह्या खरेदी केल्या. आता मुलगा अधिकारी झाल्याने झालेला आनंद शब्दात व्यक्त न करता येण्यासारखा असल्याचं महेशच्या आईने सांगितलं.
कसा होता प्रवास?
“बारावीला कमी गुण मिळाले. तसेच सीईटी परीक्षेत देखील अपेक्षित गुण मिळाले नाहीत. त्यामुळे थेट इंजीनियरिंग न करता पॉलिटेक्निक डिप्लोमा केला. त्यानंतर पुढे इंजीनियरिंग सिंहगड इन्स्टिट्यूट पुणे येथे पूर्ण केलं. याच काळात मित्रांच्या साथीने माझा एमपीएससीचा खरा प्रवास सुरू झाला. नुकत्याच जाहीर झालेल्या महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत माझी सहाय्यक वाहतूक अधिकारी वर्ग एक पदी निवड झाली आहे. याचा माझ्या संपूर्ण कुटुंबाला आनंद असल्याचे महेश चोथे यांनी सांगितलं.