जालना : सध्या लग्नसराईचा सिझन सुरू आहे. प्रत्येक जण आपला विवाह अविस्मरणीय व्हावा यासाठी वाटेल ते करण्यासाठी तयार असतो. त्यामुळे सहाजिकच विवाह सोहळ्यावर लाखो रुपयांचा निधी खर्च होतो. भारतीय परंपरेत विवाह सोहळ्यामध्ये भरपूर खर्च करण्याची देखील परंपरा आहे. परंतु जालना जिल्ह्यातील शितल चौधरी या मुलीने आपला विवाह सोहळा अत्यंत कमी खर्चात उरकून वाचलेल्या पैशातून गावातील मंगल कार्यालयासाठी तो निधी देण्याचा स्तुत्य निर्णय घेतला आहे. लग्नातील वाचलेले तब्बल 3 लाख रुपये शितल या तरुणीने गावच्या सरपंचाकडे सुपूर्द केलेत. या 3 लाख रुपयांच्या निधीमध्ये गावातील मंगल कार्यालयाजवळ जेवणावळीसाठी पत्र्याचा डोम ठोकण्यात येणार आहे.
advertisement
जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील जवखेडा ठोंबरे या गावची शितल चौधरी ही रहिवासी आहे. तिचा विवाह सोहळा अमरावती येथील एका तरुणाशी ठरला. मात्र विवाह सोहळ्यावर होत असलेला अनाठायी खर्च टाळून त्यातून समाज उपयोगी काहीतरी काम व्हावे असं शितलला नेहमीच वाटायचं. गावामध्ये गोरगरिबांची विवाह सोहळे पार पडावेत यासाठी छोटंसं मंगल कार्यालय बांधण्यात आलं आहे.
नोकरी सोडली, युट्यूबवर पाहून सगळं शिकलं, आता वर्षाकाठी 55 लाखांची उलाढाल
मात्र या मंगल कार्यालयात जेवणावळीसाठी जागेची कमतरता होती. त्यामुळे अनेकदा ग्रामस्थांची गैरसोय व्हायची हीच बाब लक्षात घेऊन शितल हिने विवाह सोहळ्यावर होणारा अनाठायी खर्च टाळून तो निधी गावात जेवणावळीसाठी शेड उभारण्यासाठी देण्याची कल्पना कुटुंबीयांना सांगितली. ही कल्पना कुटुंबातील सर्व सदस्यांना आवडली.
लगेचच तब्बल 3 लाख रुपयांचा धनादेश शितल आणि तिच्या कुटुंबीयांनी गावच्या सरपंचाकडे सुपूर्द केला. या निधीमधून गावात असलेल्या मंगल कार्यालयाजवळच पत्र्याचा डोम करण्यात येणार आहे. विवाह सोहळ्यावर होणारा अनाठायी खर्च टाळून समाज उपयोगी काहीतरी व्हावे ही शितल या तरुणीची कल्पनाच अत्यंत स्तुत्य आहे. परंतु या कल्पनेला सत्यात उतरवत शितल हिने इतर तरुणींपुढे आदर्श ठेवला आहे.
शितलने घेतलेला निर्णय हा आमच्या सर्व कुटुंबाच्या अनुमतीने घेण्यात आला. विवाह सोहळ्यावर अनाठायी खर्च करण्याची परंपरा वाढत चालली आहे हाच खर्च समाज उपयोगी कार्यासाठी द्यावा असं तिचं मत होतं. त्याला आम्ही सर्व कुटुंबीयांनी पाठिंबा दिला. समाजातील इतर जाणकार लोकांनी देखील विवाह सोहळ्यावर होणाऱ्या अनाठायी खर्चातून समाज उपयोगी काम करावं, असं आवाहन शितलचे वडील अशोक बन्सीलाल चौधरी यांनी केलं. लहानपणापासूनच मी लग्नावर होणारा खर्च टाळून काहीतरी समाज उपयोगी करण्याचं ठरवलं होतं, असं शितलने सांगितलं.