जालन्यातील एका शेतकऱ्याने सोयाबीनच्या खर्च आणि उत्पन्नाचा हिशोब दिला आहे. एक एकर सोयाबीनच्या लागवडीसाठी पेरणीपासून उत्पन्नापर्यंत किती खर्च येतो आणि शेतकऱ्यांच्या हातात किती पैसे राहतात, हे जाणून घेऊया.
एक एकर सोयाबीनच्या सुरुवातीच्या खर्चाबाबत बोलायचं झाल्यास, नांगरणीसाठी 2000 रुपये लागतात. यानंतर रोटाव्हेटर वापरण्यासाठी 1000 रुपये, पेरणीसाठी पुन्हा 1000 रुपये खर्च येतो. बियाण्याची बॅग सुमारे 4000 रुपये आहे आणि खतासाठी 1500 रुपये खर्च करावा लागतो. बियाण्याची प्रक्रिया करण्यासाठी 400 ते 500 रुपये लागतात, म्हणजे पेरणीपर्यंतच शेतकऱ्यांचा खर्च 10 हजार रुपये इतका होतो.
advertisement
यानंतर, तण नाशक आणि कीटकनाशकांच्या फवारणीसाठी साधारणतः 5000 ते 6000 रुपये खर्च येतो. सोयाबीनची काढणी करताना 4000 ते 5000 रुपये लागतात. पाऊस आल्यानंतर सोयाबीनच्या गंजीवर झाकण्यासाठी 1000 रुपये खर्च करावा लागतो. मळणीसाठीही 1000 रुपये लागतात.
एकूण खर्च म्हणजे 20 ते 22 हजार रुपये प्रति बॅग सोयाबीन लागतो. यावर्षी सोयाबीनचा उतारा 5 ते 6 क्विंटलच्या आसपास येत आहे. जर एकरी सहा क्विंटल सोयाबीनला सरासरी 4000 रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला, तर एकूण 24 हजार रुपये उत्पन्न होते. पण 20 ते 22 हजारांच्या खर्चानंतर शेतकऱ्यांच्या हातात फक्त 2 ते 4 हजार रुपयेच राहतात. यामध्ये मजुरीचा खर्च देखील समाविष्ट केला, तर शेतकऱ्याला काहीच राहत नाही, असे शेतकरी बाबुराव बोरडे यांनी सांगितले.





