TRENDING:

कर्जत जामखेड विधानसभा निवडणूक 2024 : रोहित पवारांसाठी भाजपबरोबरच काकांशीही लढावं लागणार; राम शिंदे यांची जोरदार तयारी

Last Updated:

Maharashtra Assembly Election 2024, karjat jamkhed Assembly Constituency : रोहित पवार यांच्याकडे कर्जत जामखेडचा सुभा कायम राहणार की भाजपचे राम शिंदे त्यांच्याकडून तो पुन्हा भाजपकडे आणणार याविषयी उत्सुकता आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
अहमदनगर :  जिल्ह्याचं नामकरण अहिल्यानगर झाल्यानंतरची ही पहिली निवडणूक नगरकरांसाठी खास असणार आहे. नगर जिल्ह्यातील हाय प्रोफाइल लढतींपैकी एक आहे कर्जत जामखेड मतदारसंघातील लढत. शरद पवार यांचे नातू आणि अजित पवार यांचे पुतणे आमदार रोहित पवार या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात. गेल्या निवडणुकीत त्यांनी कर्जत जामखेडमधून निवडून येत 25 वर्षं भाजपकडे असलेला गड जिंकला होता. आता या वेळी महाराष्ट्रात  महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशा तीन तीन पक्षांच्या युती-आघाडीचं अभूतपूर्व राजकारण रंगलेलं आहेत. अशात रोहित पवार यांच्याकडे कर्जत जामखेडचा सुभा कायम राहणार की भाजपचे राम शिंदे त्यांच्याकडून तो पुन्हा भाजपकडे आणणार याविषयी उत्सुकता आहे.
कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघ
कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघ
advertisement

कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघ इतिहास

कर्जत-जामखेर विधानसभा मतदारसंघात नगर जिल्ह्यातील कर्जत आणि जामखेड हे दोन तालुके येतात. अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचा हा भाग आहे. सुरुवातीला काँग्रेसची मक्तेदारी कर्जत जामखेडमध्ये होती. त्याला पहिला छेद दिला 1978 मध्ये रिपब्लिकन पार्टीचे उमेदवार बाजीराव कांबळे यांनी.

त्यानंतर पुन्हा काँग्रेसचेच आमदार झाले. पण 1995 मध्ये राज्यात सेना-भाजप युतीची लाट आली त्या वेळी कर्जत जामखेडदेखील भगवं झालं. भाजपचे सदाशिव लोखंडे 1995 पासून सलग तीन निवडणुका जिंकत आमदार झाले. 2008 मध्ये मतदारसंघांची पुनर्ररचना झाली. काही भौगोलिक सीमा बदलल्या त्यानंतर भाजपचे राम शिंदे कर्जत जामखेडमधून भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहेत. लोखंडेंचा विजयी रथ राम शिंदे यांनीही सलग दोन निवडणुकांमध्ये दौडवला. 2009 आणि 2014 ची निवडणूक राम शिंदे यांनी भाजपसाठी जिंकली. पण गेल्या निवडणुकीत रोहित राजेंद्र पवार यांनी राम शिंदेंचा पराभव केला आणि राष्ट्रवादी काँग्रेसला कर्जत-जामखेडची जागा पहिल्यांदाच मिळाली.

advertisement

2019 विधानसभा निवडणुकीत काय झालं?

रोहित पवार – राष्ट्रवादी – 1,35,824

राम शिंदे – भाजप -  92,477

2019 च्या विधानसभा निवडणुकीतून रोहित पवार यांचं महाराष्ट्राच्या राजकीय परिघात आमदार म्हणून आगमन झालं. त्यांनी कर्जत-जामखेड मतदारसंघातून भाजपाचे तत्कालीन मंत्री राम शिंदे यांना हरवत इतिहास घडवला. पहिल्यांदाच या मतदारसंघात राष्ट्रवादीचा आमदार झाला. रोहित पवार यांनी तब्बल 43,347 मतांनी राम शिंदे यांचा पराभव केला होता. 25 वर्षापासून सत्ता असलेल्या कर्जत-जामखेड मतदार संघामध्ये भाजपला नामोहरम व्हावं लागलं. रोहित पवार यांना 1 लाख 35 हजार 824 मतं मिळाली. तर राम शिंदे यांना मतं मिळाली.

advertisement

पण या निवडणुकीला राष्ट्रवादी काँग्रेस एकसंध होती. अजित पवार यांचे कार्यकर्तेही रोहित पवारांच्या मागे होते. आता पवार कुटुंबीयांमध्ये फूट पडली आहे आणि रोहित पवार त्यांचे काका अजित पवार यांच्या विरोधात बोलत आहेत. रोहितला कर्जत जामखेडमधून उभा राहा यासाठी मीच आग्रह केला आणि त्याच्या विजयासाठी प्रयत्न केले होते, असं म्हणत अजित पवारांनी भावनिक आवाहन करत राजकारण सुरू केलं आहे. रोहित पवारही त्यानंतर काकांविरोधात सिंपथी मिळवायचा प्रयत्न करत आहेत. विधानसभा निवडणुकीत भाजप आणि अजित पवार यांच्याकडून रोहित पवार यांना लक्ष्य केलं जाण्याची शक्यता आहे.

advertisement

2024 लोकसभा निवडणुकीला काय झालं?

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत अहमदनगर लोकसभेत भाजपला पराभव पत्करावा लागला. निलेश लंके जाएंट किलर ठरले. भाजपचे माजी खासदार सुजय विखे-पाटील यांना शरदचंद्र पवार गटाच्या निलेश लंके यांनी पराभूत केलं. या निलेश लंकेंविरोधात अजित पवार स्वतः प्रचार करत होते. आणि त्यांच्या निमित्तानेचकाका-पुतण्यांमधील संघर्ष सगळ्यांना दिसला होता. कर्जत-जामखेड विधानसभेचे आमदार रोहित पवार यांनी महायुतीचा पराभव करण्यासाठी पुरेपूर प्रयत्न केले होते आणि त्यांच्या मतदारसंघात भाजपचे सुजय विखे पाटील बरेच पिछाडीवर होते. यामुळे रोहित पवारांचा आत्मविश्वास उंचावला आहे. कर्जत जामखेडमधून निलेश लंके यांना 1,04,953 मतं तर सुजय विखे यांना 95835 एवढी मतं मिळाली. त्यामुळे माजी पालकमंत्री असलेल्या राम शिंदे यांना मेहनत घ्यावी लागणार आहे. भाजप नेतृत्वाने शिंदे यांच्यावर चौथ्यांदा विश्वास दाखवत उमेदवारी दिली आहे.

advertisement

अहमदनगर जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघांचं सध्याचं बलाबल

राज्यातील सर्वात मोठा जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नगर जिल्ह्यात विधानसभेचे एकूण 12 मतदारसंघ आहेत.

  1. अकोले - किरण लहामटे (राष्ट्रवादी)
  2. संगमनेर - बाळासाहेब थोरात (काँग्रेस)
  3. शिर्डी - राधाकृष्ण विखे पाटील (भाजप)
  4. कोपरगाव - आशुतोष काळे (राष्ट्रवादी)
  5. श्रीरामपूर - लहू कानडे (काँग्रेस)
  6. नेवासा- शंकरराव गडाख (अपक्ष) आता शिवसेना (उबाठा)
  7. शेवगाव पाथर्डी - मोनिका राजळे (भाजप)
  8. राहुरी - प्राजक्ता तनपुरे (राष्ट्रवादी)
  9. पारनेर - निलेश लंके (राष्ट्रवादी) सध्या रिक्त
  10. अहमदनगर शहर - संग्राम जगताप (राष्ट्रवादी)
  11. श्रीगोंदा- बबनराव पाचपुते (भाजप)
  12. कर्जत जामखेड - रोहित पवार (राष्ट्रवादी)

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
पुणेकरांनो सावधान! कॉल फॉरवर्डिंगमधून बँक खात होऊ शकतं रिकामं; अशी घ्या काळजी
सर्व पहा

-

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
कर्जत जामखेड विधानसभा निवडणूक 2024 : रोहित पवारांसाठी भाजपबरोबरच काकांशीही लढावं लागणार; राम शिंदे यांची जोरदार तयारी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल