कस्तुरबामध्ये पुस्तक वाटपावरून वाद झाल्याने शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने रुग्णालयात बैठक घेण्यात आली. या बैठकीला भायखळ्याचे आमदार मनोज जामसुदकर, ठाकरे गटाचे पदाधिकारी बबन गावकर, विभाग प्रमुख विजय कामठेकर, चंदना साळुंखे आदी पदाधिकारी उपस्थित होते. तसेच ज्यांनी पुस्तके नाकारली त्या परिसेविका ऋतुजा गोपाळ दडप या देखील उपस्थित होत्या. बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळेच आम्ही परिचारिका म्हणून ताठ मानेने काम करू शकतो, असे सांगत कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर माफी मागते, असे वादानंतर ऋतुजा दडप यांनी स्पष्ट केले.
advertisement
१०० वर्षांपूर्वीची पुस्तकं वाटून काय मिळवायचे होते?
पेडणेकर म्हणाल्या, "पुस्तकाची फेकाफेक झालेली नाही. पुस्तक नाकारण्यात आणि फेकण्यात फरक आहे. समाजात तेढ निर्माण करणारी पुस्तके नकोत असे परिचारिकांचे म्हणणे होते. प्रबोधनकारांचं पुस्तक मागे होते, ते पुस्तक फेकले नाही, शंभर वर्षांपूर्वीचे विचार असलेले पुस्तके वाटण्याचा प्रयत्न केला. दोन चार सिस्टरने पुस्तकांचे कव्हर बघून पुस्तके नाकारली. आम्ही पुस्तके घेऊ शकत नाही, असे त्यांनी सांगितले. मुळात निवृत्त कर्मचारी राजेंद्र कदम यांच्या अनेक तक्रारी आहेत. ते सेवाकाळात वादग्रस्तही राहिलेले आहेत. प्रबोधनकर ठाकरेंचे पुस्तक मागे होते. कोणीही पुस्तके झिडकारली नाही, ती केवळ नाकारली. पुस्तके फेकल्याचा व्हिडीओ खरा की खोटा हे पोलीस शोधून काढतील. देश स्वातंत्र्य होण्याअगोदरचे पुस्तक वाटून तुम्हाला नेमके काय मिळवायचे आहे? कदम याच्या मागे असणारा आका कोण आहे, याची चौकशी व्हावी", असे पेडणेकर म्हणाल्या.
ज्यांनी पुस्तके नाकारली, त्यांचे काय म्हणणे?
परिसेविका ऋतुजा गोपाळ दडप म्हणाल्या, "मी ३२ वर्षांपासून कस्तुरबा रुग्णालयात काम करते. कदम यांनी आमच्या वरिष्ठांकडून पुस्तक वाटपाची परवानगी घेतलेली नव्हती. आमचा अमुल्य वेळ त्यांनी खर्ची घातला. पुस्तक घ्याच अशी जबरदस्ती त्यांनी आम्हाला केली. आम्ही नको म्हणत असतानाही दोन परिचारिकांच्या आणि माझ्या टेबलवर पुस्तके ठेवून ते निघून गेले. परंतु पुस्तके नाकारल्याने कुणाची मन दुखावली असतील, तर दिलगिरी व्यक्त करते. बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे आम्ही नर्स म्हणून ताठ मानेने काम करतोय. आम्हाला कुणाचीही मने दुखावायची नव्हती".
