हरितालिका व्रताचं महत्त्व
हरितालिका हे व्रत सर्वात कठीण व्रतांपैकी एक मानलं जातं. स्त्रिया दिवसभर निर्जल उपवास करतात आणि संध्याकाळी देवी गौरी आणि भगवान शंकराची पूजा करतात. पुराणांतील दाखल्यांनुसार, राजा हिमालयाची मुलगी पार्वतीनं सर्वात अगोदर हरितालिकेचा उपवास केला होता. या व्रताच्या प्रभावामुळेच तिला शिव पती रुपात मिळाले.
advertisement
व्रत कोण करू शकतं?
बहुतांशी वेळा असा समज आढळतो की, हरतालिका व्रत फक्त कुमारी किंवा विवाहित स्त्रियाच करू शकतात. मात्र, हा समज चुकीचा आहे. मुंबईतील आदित्य जोशी गुरुजींनी लोकल 18शी बोलताना सांगितलं की, हरतालिका व्रत हे स्त्रियांसाठी सार्वत्रिक आहे. कुमारी, विवाहित तसेच विधवा स्त्रियाही हे व्रत करू शकतात. यामुळे सौभाग्य, आरोग्य, वंशवृद्धी आणि ऐश्वर्य प्राप्त होतं, अशी मान्यता आहे.
व्रत-विधी
सकाळी आंघोळ करून पिवळा, हिरवा किंवा लाल रंगाचा पेहराव करावा. देवघरात वाळू किंवा मातीची शिव-पार्वतीचे प्रतिक स्थापित करून पूजा करावी. सर्वात अगोदर गणेशपूजनानंतर शिव-पार्वतीला बेलपत्र, फुलं, धूप-दीप अर्पण करावेत. हरतालिका व्रतकथा श्रवण करून रात्रभर जागरण केलं जातं. उपवास हा प्रथा-परंपरेनुसार निर्जल असतो. पण, आरोग्याच्या दृष्टीने गरज भासल्यास सल्ल्यानुसार तोडगा काढला जातो. त्यामुळे फलाहार दुग्धहार करता येतो.





