कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसने माजी नगरसेवक लाटकर यांना उमेदवारी दिलीय. काँग्रेसच्या तिसऱ्या यादीत त्यांचे नाव जाहीर होताच अज्ञातांकडून काँग्रेस कमिटीच्या कार्यालयावर हल्ला करण्यात आला आहे. शनिवारी रात्री साडे बारा वाजता कार्यलयावर दगडफेकीची घटना घडली. या घटनेनंतर कार्यालयाच्या परिसरात शाहूपुरी पोलिसांनी फौजफाटा तैनात केला आहे.
मविआत कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघ काँग्रेसच्या वाट्याला आला. पण पहिल्या दोन यादीत इथला उमेदवार निश्चित झाला नव्हता. काँग्रेसने शनिवारी रात्री उशिरा तिसरी यादी जाहीर केली. यात माजी नगरसेवक राजेश लाटकर यांना उमेदवारी देण्यात आली.
advertisement
Congress List : मविआचा धमाका, काँग्रेसची तिसरी यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
राजेश लाटकर यांना उमेदवारी मिळताच रात्री साडे बाराच्या सुमारास काही कार्यकर्ते स्टेशन रोडवर असणाऱ्या काँग्रेस कमिटी कार्यालयाबाहेर आले. कार्यालयावर दगडफेक करून काँग्रेसच्या चिन्हाला काळं फासलं. तसंच कार्यालयाच्या भिंतीवर चव्हाण पॅटर्न, चव्हाण असं लिहिण्यात आलं आहे.
कोल्हापूर उत्तरमधून अनेकजण निवडणुकीसाठी इच्छुक होते. त्यांनी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांकडे यासाठी चर्चाही केली. पण राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर मविआसोबत राहिलेल्या राजेश लाटकर यांना उमेदवारी दिल्यानं नाराज झालेल्या पक्षातील पदाधिकाऱ्यांच्या कार्यकर्त्यांनी ही दगडफेक केली असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केलीय. दरम्यान, दगडफेकीच्या या घटनेमुळे काँग्रेसमध्ये अंतर्गत वादाची शक्यता आहे.
मविआकडून शनिवारी याद्या जाहीर करण्याचा धडाका
महाविकास आघाडीमध्ये मागील काही दिवसांपासून जागावाटपावरून पेच निर्माण झाला होता. हा वाद अखेरीस दिल्ली हायकमांडाच्या दारात पोहोचला. दिल्लीत राहुल गांधी यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. या बैठकीनंतर महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाचा मार्ग मोकळा झाला. शनिवारी सकाळपासून शिवसेना ठाकरे गटाने दोन याद्या जाहीर केल्या. त्यापाठोपाठ शरद पवार गटानेही आपली २२ जणांची यादी जाहीर केली. रात्री उशिरा काँग्रेसकडूनही 16 उमेदवार जाहीर केले आहे. काँग्रेसने आतापर्यंत 87 उमेदवार जाहीर केले आहेत.
