गेल्या काही वर्षांत गोकुळवर सत्तेचा ताबा मिळवण्यासाठी सुरू असलेले नाट्य आज संपले आहे. गोकुळच्या अध्यक्षपदाची माळ हसन मुश्रीफ यांचे चिरंजीव नाविद मुश्रीफ यांच्या गळ्यात पडली आहे. आज होणाऱ्या अध्यक्षाच्या निवडीआधी नाविद मुश्रीफ हे गुरुवारीच परदेशातून तातडीने कोल्हापूरात दाखल झाले होते. नाविद मुश्रीफ हे गोकुळचे अध्यक्ष झाल्याने आता मुश्रीफ कुटुंबाकडे कोल्हापूरमधील आणखी एक महत्त्वाची संस्था आली आहे.
advertisement
महायुतीचा सतेज पाटलांना जोरदार धक्का...
राज्यात सत्तेत असलेल्या महायुतीच्या मोठ्या नेत्यांनी गोकुळच्या सत्ता समीकरणात थेट लक्ष घातले होते. त्यामुळे आता कोल्हापूरमधील 'मुन्ना विरुद्ध बंटी' या राजकीय संघर्षाला नवं वळण आलं. गोकुळ दूध महासंघाच्या माध्यमातून कोल्हापूरमधील ग्रामीण भागात वर्चस्व मिळवण्याची एक संधी निर्माण होते. त्यामुळेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी याबाबत विशेष लक्ष केंद्रीत केले आहे. गोकुळमध्ये सत्तेत असलेले नेते हसन मुश्रीफ यांच्यावरच समन्वयाची जबाबदारी सोपवण्यात आली होती.
सध्याचे अध्यक्ष अरुण डोंगळे यांचे बंड शांत करण्यासाठी हसन मुश्रीफ यांनी मध्यस्थी केली होती. त्यांनी सतेज पाटील यांच्याशी सहकार टिकवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, आता वरिष्ठ पातळीवरून आलेल्या आदेशामुळे त्यांनी आपला रोख बदलला.
नाविद मुश्रीफ नवे अध्यक्ष...
भाजपचे अंबरीश घाटगे आणि शिवसेनेचे अजित नरके यांची नावे अध्यक्षपदाच्या शर्यतीत आघाडीवर होते. तर, नाविद मुश्रीफ यांच्या नावाची दबक्या आवाजात चर्चा सुरू होती. नाविद यांच्याकडे अध्यक्षपद आल्याने मुश्रीफ यांचे कोल्हापूरच्या राजकारणातील वजन वाढले आहे. नाविद मुश्रीफ हे 2021 पासून गोकुळच्या संचालक मंडळावर आहेत. 2010 मध्ये ते छत्रपती शिवाजी विकास सोसायटीचे संचालक म्हणून कार्यरत आहेत. त्याशिवाय, सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याचे ते अध्यक्ष आहेत.