कोल्हापूर : आंबा म्हटलं की प्रत्येकाच्या आवडीचा विषय.. फळांचा राजा असलेल्या या आंब्याची चव उन्हाळ्याच्या दिवसातच चाखायला मिळत असते. त्यात आजकाल चविष्ट आणि नैसर्गिक पद्धतीने पिकवलेले आंबे खायला मिळणे कठीण झाले आहे. अशातच कोल्हापुरात आंबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे त्यामुळे उत्पादक ते थेट ग्राहक अशा आंबा विक्रीला सुरुवात झाली आहे. तब्बल 47 जातींचे आंबे या ठिकाणी ग्राहकांना विकत घेता येत आहेत.
advertisement
महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ, विभागीय कार्यालय, कोल्हापूर यांच्यामार्फत 19 तारखेपासून ते 23 मे पर्यंत कोल्हापूर आंबा महोत्सव 2024 चे आयोजन करण्यात आले आहे. कोल्हापूरच्या राजारामपुरी परिसरात असणाऱ्या ‘भारत हौसिंग सोसायटी हॉल'मध्ये हा महोत्सव भवण्यात आला आहे. या महोत्सवात कोल्हापूरसह रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर, रायगड या जिल्ह्यातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांनी एकूण 32 स्टॉल मांडले आहेत. तर या आंबा महोत्सवात महाराष्ट्रात उत्पादित होणाऱ्या तब्बल 47 जातींचे आंबे ग्राहकांना खरेदी करता येत आहेत. त्यामुळे या प्रदर्शनाला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याची माहिती कृषी पणन मंडळाचे कार्यकारी संचालक संजय कदम यांनी दिली आहे.
शेतकऱ्यांसाठी या पिकाची शेती म्हणजे ATM, 120 दिवसात पिक तयार अन् मिळवा भरपूर उत्पन्न
का आयोजित केला जातो आंबा महोत्सव?
पणन मंडळाकडून राज्यात विविध ठिकाणी आंबा महोत्सव आयोजित करण्यात येत असतो. तर आता कोल्हापुरकरांना सुद्धा हापूस आंब्यासह इतर अनेक चविष्ट आंब्यांचा आस्वाद घेता येत आहे. महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळामार्फत दरवर्षी ‘उत्पादक ते ग्राहक थेट विक्री’ योजने अंतर्गत विविध फळ महोत्सवांचे आयोजन करण्यात येत असते. विक्री व्यवस्थेमधील मध्यस्थांची संख्या कमी करून, शेतकऱ्यांना योग्य बाजारभाव व ग्राहकांना रास्त दरात चांगल्या गुणवत्तेचा शेतमाल मिळावा, हाच या महोत्सवांचा प्रमुख उद्देश असतो. तर आंबा महोत्सवात उपस्थित स्टॉलधारक शेतकऱ्यांच्या आंब्यांची नोंद देखील पणन विभागाकडे झाल्याने त्यांच्याकडील उत्पादन चांगल्या प्रतीचे असल्याचे महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाचे उपसरव्यवस्थापक डॉ. सुभाष घुले यांनी सांगितले.
काय आहे महोत्सवाचे वैशिष्ट्य?
या आंबा महोत्सवामध्ये महाराष्ट्रात आढळणाऱ्या आंब्याच्या 47 जातींचे वेगळे दालन तयार करण्यात आलेले आहे. तर हापूस, करूठा, कोलंबन, बैगनपल्ली, पायरी पंचदराकलशा, हिमायुददीन, राजुमन, वातगंगा, रत्ना, कोकण रुची, करुकम, काळा करेल, चेरूका रासम, विलाय कोलंबन, रानू कल्लू, जहांगीर, नाजूक पसंद, कोंडूर गोवा, तोतापुरी, छोटा जहांगीर, केसर, माया, कुलास, याकुती, कोरन, पदेरी, बनेशान, वनराज, पेढरबाम, दूधपेढा, बंगाली पायरी, निलम, मोहनभोग या जातींच्या आंब्याचा यामध्ये समावेश आहे. प्रति डझन 300 ते 700 रुपये दराने आंबा या ठिकाणी खरेदीसाठी उपलब्ध आहे.
वांग्याच्या शेतीतून शेतकऱ्याची कमाल, 50 हजार खर्चात लाखोंचं उत्पन्न, कोणती व्हरायटी वापरली?
दरम्यान दीड किलो वजनाचा वनराज हा आंबा या महोत्सवात आकर्षण ठरला आहे. तर अगदी काही ग्रामपासून दोन ते तीन किलो वजनाचे 47 आंब्यांचे प्रकारही या ठिकाणी पाहण्यासाठी ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे सकाळी 9 ते रात्री 9 पर्यंत सुरू राहणाऱ्या या महोत्सवाला जास्तीत जास्त नागरिकांनी भेट देण्याचे आवाहन देखील घुले यांनी केले आहे.