कोल्हापूर : लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची आज 26 जून रोजी जयंती आहे. यंदा शाहू महाराजांचे शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंती वर्ष आहे. त्यामुळे कोल्हापुरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यातच कोल्हापूरच्या शाहू स्मारक भवन या ठिकाणी शाहू महाराजांचा जीवनपट, त्यांचे कार्य उलगडणाऱ्या ऐतिहासिक दुर्मिळ कागदपत्रांचे तसेच छायाचित्रांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. जुन्या कोल्हापूरची झलक दाखवणारी अनेक छायाचित्रे देखील याठिकाणी मांडण्यात आली आहेत. त्यामुळे कोल्हापूरकरांना ही एक पर्वणीच ठरणार आहे.
advertisement
महाराष्ट्र शासनाच्या पुराभिलेख संचालनालयामार्फत दरवर्षी ऐतिहासिक घटनांवर आधारित ऐतिहासिक व दुर्मिळ कागदपत्रांचे प्रदर्शन भरविले जाते. यंदाचे वर्ष हे राजर्षी शाहू महाराजांचे शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंती वर्ष आहे. या वर्षाचे औचित्य साधून राजर्षी शाहू महाराजांच्या जयंतीदिनी म्हणजेच 26 जून 2024 रोजी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा जीवनपट व त्यांचे कार्य उलगडणाऱ्या ऐतिहासिक दुर्मिळ कागदपत्रांचे व छायाचित्रांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. तसेच या प्रदर्शनाच्या निमित्ताने "राजर्षी शाहू छत्रपतींचे निवडक आदेश भाग-2" या खंडाच्या सुधारित आवृतीचा प्रकाशन समारंभ या ठिकाणी पार पडला आहे.
5 लाखांचं घेतलं लोन, सुरू केला हा व्यवसाय, आज दिवसाला होतेय लाखभर कमाई, या बिर्याणीला तोडंच नाही
काय आहे प्रदर्शनाचे वैशिष्ट्य?
राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानची अधिकार सूत्रे स्वीकारल्यानंतर समाजाच्या सर्वांगीण विकासाला हातभार लावला होता. त्यामुळे या प्रदर्शनात प्रामुख्याने छत्रपती शाहू महाराजांचे दत्तक विधान, महाराजांचे राज्यारोहण, शाहूकालीन पत्रव्यवहार, शाहू महाराजांनी अस्पृश्य समाजाच्या उद्धारासाठी केलेले कार्य, दुष्काळी परिस्थितीत केलेले कार्य, शाहू महाराजांचे शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक, वैद्यकीय, कला व क्रीडा, प्रशासकीय इत्यादी क्षेत्रातील कार्य, पर्यावरण रक्षणाकरीता केलेले कार्य तसेच महाराजांनी राज्यकारभार करताना वेळोवेळी घेतलेले निर्णय इत्यादी विषयासंदर्भातील महत्वाची, निवडक कागदपत्रे ही शाहू कालीन दुर्मिळ छायाचित्रांसह याठिकाणी प्रदर्शित करण्यात आली आहेत.
अनेक दुर्मिळ पत्रांबरोबरच राजर्षी शाहू महाराजांचा जन्मदिवस 26 जून असल्याचा उल्लेख असणारे कोल्हापूरच्या सामान्य नागरिकाचे एक पत्रदेखील या ठिकाणी पाहायला मिळते, असे कोल्हापूर पुराभिलेखागार विभागाचे अभिलेख अधिकारी गणेशकुमार खोडके यांनी सांगितले आहे.
शाहू महाराजांची अनेक दुर्मिळ छायाचित्रे -
या प्रदर्शनामध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची बालपणीची, विद्यार्थी दशेतील, विविध कार्यक्रम, उद्घाटन प्रसंगांची आणि कोल्हापुरातील अनेक विकास कामांवेळची दुर्मिळ छायाचित्रे पाहायला मिळत आहेत. यामध्ये एका पर्शियन कवीने राजर्षी शाहू महाराजांवर एक पर्शियन काव्य करून ते पुस्तक रूपाने प्रदर्शित केले होते. त्या पुस्तकामधील राजर्षी शाहू महाराजांचे वयाच्या 10 ते 12 व्या वर्षातले एक दुर्मिळ छायाचित्र देखील याठिकाणी पाहायला मिळते, असेही गणेशकुमार खोडके यांनी सांगितले आहे.
दरम्यान, हे प्रदर्शन दिनांक 26 ते 30 जून 2024 या पाच दिवसांच्या कालावधीत सकाळी 10 ते सायंकाळी 7.30 या वेळेत राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्ट, शाहू स्मारक भवन, दसरा चौक, कोल्हापूर येथे भरविण्यात आले आहे. प्रदर्शन सर्वांसाठी विनामुल्य खुले राहणार आहे. त्यामुळे कोल्हापूरकरांनी या प्रदर्शनाला नक्की भेट द्यावी, असे आवाहनही खोडके यांनी केले आहे.