कोल्हापूर : कोल्हापुरातील हुपरी ही एक चंदेरी नगरी आहे. चांदीच्या विविध वस्तू आणि दागिने या ठिकाणी बनवले जातात. याच हुपरीच्या एका चांदी मजुराच्या मुलाने फौजदारकीचे आपले स्वप्न पूर्ण केले आहे. मेहनत घेऊन स्वतःवर विश्वास ठेवत त्याने पोलीस उपनिरीक्षक परीक्षेत त्याने बाजी मारली आहे. आपल्या मुलाने मिळवलेल्या या यशामुळे पहिल्यापासून गरिबीचे दिवस पाहिलेल्या आईवडिलांनाही आनंद गगनात मावेनासा झाला आहे.
advertisement
कोल्हापूरच्या हातकणंगले तालुक्यातील हुपरीनजिक असणाऱ्या तळंदगे या गावात गुंडाळे परिवार राहतो. या परिवारातील जवाहर गुंडाळे हे अगदी लहानपणापासूनच चांदी कारागीर म्हणून काम करतात. त्यामुळे घरची परिस्थिती देखील जेमतेमच असायची. त्यातच त्यांचा मुलगा भाग्येश गुंडाळे याने नुकत्याच काही दिवसांपूर्वीच निकाल जाहीर झालेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पोलीस उपनिरीक्षक परीक्षेत यश मिळवले आहे.
inspiring story : वडील वॉचमन, आईसह तिनेही केली लोकांच्या घरची धुणीभांडी, पण न खचता आज सीमा बनली PSI
भाग्येशने सर्व शालेय शिक्षण आपल्या गावातच पूर्ण केले होते. तर इचलकरंजी येथील गोविंदराव ज्युनिअर कॉलेजमधून अकरावी, बारावीचे सायन्स विषयातील शिक्षण पूर्ण केले. पुढे त्याने कोल्हापूरच्या विवेकानंद महाविद्यालयातून रसायनशास्त्र विषयात बीएस्सीची पदवी मिळवली. मात्र, स्पर्धा परीक्षा देऊन अधिकारी होण्याचा स्वप्न त्याने मनाशी बाळगले होते. त्यामुळे घरची परिस्थिती बदलण्याच्या हेतूने त्याने स्पर्धा परीक्षांची तयारी सुरू केली.
स्पर्धा परीक्षांसाठी सोडली एमआयडीसीतील नोकरी -
भाग्येशचे वडील हे एक चांदी मजूर कामगार आहेत. त्यामुळे घरची आर्थिक परिस्थिती बेताचीच असल्यामुळे पदवीच्या शिक्षणानंतर दोन वर्ष भाग्येशने एमआयडीसीमध्ये काम देखील केले आहे. पण कामामुळे अभ्यासाला पुरेसा वेळ मिळत नव्हता. म्हणून हातातली नोकरी सोडली व पूर्णवेळ पीएसआयची तयारी सुरू केली. यानंतर वीराचार्य अकॅडमी धर्मनगर येथे जैन मुनि आचार्य श्री चंद्रप्रभूसागर महाराज यांच्या आशीर्वादासह निवासी विद्यार्थी म्हणून निवड झाली.
याठिकाणी मोफत निवासाची आणि शिक्षणाची संधी मिळाली. इथूनच पूर्व, मुख्य, मैदानी चाचणी, मुलाखतीपर्यंतचे टप्पे पार करत गेल्यानंतरही 2020 साली पीएसआय परीक्षेत फक्त अर्ध्या मार्कामुळे अपयश आले. त्यानंतर खचून न जाता पुन्हा तयारी करून 2021 च्या परीक्षेत यश मिळवल्याचे भाग्येश सांगतो.
दरम्यान, आपल्या घरची परिस्थिती सुधारण्यासाठीच आई वडिलांसह छत्रपती शिवाजी महाराजांमुळेच या क्षेत्रात येण्याची प्रेरणा मिळाली, असेही भाग्येश अभिमानाने सांगतो. त्याच्या या यशामुळे सध्या मित्रपरिवारांसह नातेवाईकांकडून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.





