गणेश मंडळांची तयारी सुरू
फक्त महिन्यावर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवासाठी गणेश मंडळांची लगबग सुरू झाली आहे. कोल्हापुरातील बरीचशी मंडळ आपल्या गणरायाच्या स्वागतासाठी डॉल्बी ठरवत असतात आणि त्याच पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने कोल्हापुरातील साऊंड, लाईट व स्ट्रक्चर असोशिएसन आणि व्यावसायिक यांची बैठक बोलावली होती. या बैठकीत पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी सर्वांनाच ध्वनी प्रदूषण लेझर आणि वेळेची मर्यादा आदींच्या नियमांबाबत मार्गदर्शन केले.
advertisement
एक क्लिक हजार शब्दांचा, तुम्हीच निवडा बेस्ट PHOTO
काय असणार आहेत नियम?
कोल्हापुरात गणेशोत्सवासाठी मिरवणूक काढणाऱ्या प्रत्येक मंडळाला पोलीसांकडून परवानगी घ्यावी लागणार आहे. मिरवणुकीसाठी वापरले जाणारे ट्रॅक्टर आणि ट्रेलर या दोघांचेही परवाने असणे बंधनकारक आहे. जर तसे नसल्याचे आढळले तर मंडळ आणि मालक दोघांनाही प्रत्येकी पाच हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे. मिरवणुकीवेळी ट्रेलरवरील डॉल्बी, लाईट किंवा देखाव्यासाठी बसवण्यात आलेले स्ट्रक्चर हे तीन मीटर असायला हवे. त्याचबरोबर हे स्ट्रक्चर फक्त 8 बाय 10 साईजचेच असावे. दरम्यान, मंडळांना सर्व परवानगी एकाच ठिकाणी मिळण्यासाठी एक खिडकी योजना राबवण्यात येणार आहे.
नियम पाळणार पण थोडी शिथिलता हवी..
पारंपारिक वाद्यांबरोबरच मोठमोठ्या साऊंड सिस्टिम ठरवण्याचे प्रमाण सार्वजनिक गणेश मंडळांमध्ये वाढलेले आहे. डॉल्बी साठी दोन-दोन लाख खर्च करणारी मंडळे देखील कोल्हापुरात आहेत. त्यामुळे नियमांचे पालन करूनच का होईना, पण आम्ही मोठ्या उत्साहात डॉल्बी सोबतच यंदाचा गणेशोत्सव साजरा करणार असल्याचे मत कोल्हापुरातील काही मंडळांचे आहे. तर या सगळ्या नियमांचे पालन करताना यामध्ये थोडी शिथिलता देखील मिळाली पाहिजे असेही काही जणांचे म्हणणे आहे. कोल्हापुरातील संयुक्त जुना बुधवार तालीम मंडळ हे एक सर्वात जुन्या मंडळांपैकी एक आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही आमच्या मंडळाचा गणेशोत्सव नियमांना धरूनच पण तरीही मोठ्या उत्साहात साजरा होईल, असे जुना बुधवार तालीम मंडळाचे उत्सव कमिटीचे माजी अध्यक्ष सुशांत महाडिक यांनी सांगितले.
यंदा काय आहे गणेश मूर्तींचा ट्रेंड? पाहा कुंभार गल्ल्यांमधील लगबग, Video
मंडळांच्या बैठकी बाकी
सार्वजानिक गणेश मंडळे आणि पोलीस यांची देखील बैठक बाकी आहे. त्यामध्ये आम्ही नियमावली शिथिलतेबाबतच्या आमच्या मागण्या मांडणार असल्याचे मत देखील सुशील भांदिगरे, सुशांत महाडिक यांनी व्यक्त केले. दरम्यान पारंपारिक वाद्यांचा गजर असू दे किंवा डॉल्बीचा दणदणात कोल्हापुरात गणरायाचे स्वागत आणि गणेशोत्सव मोठ्या उत्साहात पार पडत असतो. त्यामुळे सार्वजनिक गणेश मंडळांसह सर्वांनाच आता गणपती बाप्पाच्या आगमनाची आस लागून राहिली आहे.