कोल्हापूर : शिवरायांचे आठवावे रुप | शिवरायांचा आठवावा प्रताप | शिवरायांचा आठवावा साक्षेप| भूमंडळी | अशा शब्दांत छत्रपती शिवरायांच्या कार्याची महती सांगितली जाते. हीच महती सांगत कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा गेल्या 50 वर्षांपासून ऊन, वारा, पावसात पहाडासारखा उभा आहे. शिवाजी विद्यापीठात येणारा आणि विद्यापीठासमोरून जाणारा प्रत्येकजण या देखण्या आणि रुबाबदार पुतळ्याला गेल्या 50 वर्षांपासून हात जोडत आला आहे. याच छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला 1 डिसेंबर रोजी 50 वर्षे पूर्ण होत असून त्याचा सुवर्णमहोत्सव साजरा होतोय. याबाबत शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे यांनी लोकल18 सोबत बोलताना माहिती दिलीये.
advertisement
शिवाजी विद्यापीठ दक्षिण महाराष्ट्रातील विद्येचं प्रमुख पीठ मानलं जातं. उच्च शिक्षणाच्या संधी ग्रामीण भागातील उपलब्ध करुन देण्याच्या उदात्त हेतूने या विद्यापीठाची स्थापना झाली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं स्थापन झालेल्या विद्यापीठाच्या प्रांगणात असणारा छत्रपती शिवरायांचा पुतळाही अलौकिक आहे. घोड्यावर बसलेल्या युगपुरुषाने डाव्या हाताने लगाम खेचावा आणि त्याचक्षणी घोडा थांबावा, असा देखणा प्रसंग पुतळ्यात दिसतोय. अश्वारूढ पुतळ्यात छत्रपतींच्या उजव्या हातात तलवार तर डाव्या हातात घोड्याचा लगाम असून पुतळा पाहता क्षणी त्यांच्या कर्तृत्वाची झलक दिसते.
आठवण स्वातंत्र्य लढ्याची आणि सैनिकांची, शिवाजी विद्यापीठाचा कौतुकास्पद उपक्रम
गेल्या 50 वर्षांपासून दिमाखात उभा असलेल्या या पुतळ्याच्या निर्मिताचाही एक वेगळा इतिहास आहे. 1970 मध्ये शिवाजी विद्यापीठाचे पहिले कुलगुरु डॉ. आप्पासाहेब पवार यांच्या इच्छेनुसार वर्तमानपत्रांत जाहिरात प्रसिद्ध झाली आहेत. पुणे येथील शिल्पकार बी.आर. खेडकर यांनी बनवलेली प्रतिकृती सर्वांनी आवडली. त्यानुसार इयत्ता दुसरीपर्यंत शिक्षण झालेले आणि विविध ठिकाणी 500 हून अधिक पुतळे उभारण्याचा अनुभव असणाऱ्या खेडकर यांना पुतळा बनवण्यास सांगितल्याचं कुलसचिव डॉ. शिंदे सांगतात.
आंध्रप्रदेश, तामिळनाडूतून आणला दगड
शिवाजी विद्यापीठाच्या प्रांगणातील पुतळ्याच्या उभारणी कामाला 1971 मध्ये सुरुवात झाली. 8 टन वजनाच्या या पुतळ्याची पूर्णत: ब्राँझमधील घडण आहे. चौथऱ्यासह या पुतळयाची एकूण उंची 36 फूट 6 इंच आहे. पुतळ्याची उंची 18 फूट 6 इंच तर लांबी 20 फूट इतकी आहे. या पुतळ्याच्या चौथऱ्यासाठी गुलाबी ग्रॅनाइटचा दगड वापरला आहे. तो आंध्रप्रदेश, तामिळनाडू राज्यातून आणण्यात आला होता. पुतळयाच्या चौथऱ्याचे काम कांचीपुरम येथील डॉ. अमरेंद्र कामत यांनी केले. पुतळ्यासाठी दगड घडविण्याचे काम तामिळनाडूतील कारागिरांनी केले.
विद्यार्थी करणार मोत्यांची शेती, शिवाजी विद्यापीठ देतंय खास प्रशिक्षण, Video
लोकसहभागातून उभारला पुतळा
छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारणीसाठी समाजाने योगदान दिले. पंचगंगा, वारणा, कुंभी-कासारी, दूधगंगा-वेदगंगा कारखान्यांनी प्रत्येकी 60 हजार रुपये दिले. प्राध्यापक, कर्मचारी व नागरिकांनी मिळून 66 हजार 590 रुपये जमा केले. पुतळ्याचे काम सलग तीन वर्षे सुरू होते. 1 डिसेंबर 1974 रोजी आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते पुतळा अनावरण झाले. आशिय खंडातील ही सगळ्यात देखणी शिल्पकृती आहे,” असं डॉ. व्ही. एन शिंदे सांगतात.
सुवर्ण महोत्सव वर्षानिमित्त
शिवाजी विद्यापीठाच्या प्रांगणात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची प्रशासनाकडून नियमित देखभाल केली जाते. 1 डिसेंबरला सुवर्ण महोत्सव साजरा होत आहे. यानिमित्त विद्यापीठ प्रशासनाच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. संपूर्ण पुतळ्याला शोभिवंत फुलांच्या माळांची आरास, पुतळा परिसराला आकर्षक विद्युत रोषणाई, शिवकाल उलगडणार पोवाडा अशा शिवमय वातावरणात अश्वारुढ पुतळा अनावरणाचा सुवर्णमहोत्सव दिन साजरा झाला.