कोल्हापूर : कोल्हापूर हे एक ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा जपणारे शहर आहे. याच ओळखीला समोर ठेऊन कोल्हापूर विमानतळाची हेरिटेज लूक असणारी नवीन इमारत उभारण्यात आली आहे. नुकतेच या विमानतळाच्या नव्या टर्मिनल इमारतीचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने झाले. अगदी अद्ययावत, सुसज्ज अशा या नव्या टर्मिनल इमारतीमध्ये कोल्हापूरची संस्कृती आणि नवीन टेक्नॉलॉजीची सांगड घालण्यात आली आहे. त्यामुळे कोल्हापूरच्या वैभवात, उद्योगवाढीमध्ये अजूनच भर पडण्यास मदत होणार आहे.
advertisement
देशातील विविध शहरांच्या विमानतळांच्या विस्तारीकरणाची आणि विकासाची एक विशेष मोहीम भारतीय विमानतळ प्राधिकरणाने हाती घेतली आहे. त्यामधूनच कोल्हापूर विमानतळावर देखील अनेक सोयीसुविधा वाढवण्यात आल्या आहेत. कोल्हापूर विमानतळाची हेरिटेज लूक असणारी सुंदर अशी टर्मिनल बिल्डिंगही त्याचाच एक भाग आहे. अत्यंत सुसज्ज अशा या इमारतीत कोल्हापूरच्या संस्कृतीची ओळख घडवून आणणाऱ्या अनेक गोष्टींचा समावेश करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत या नव्या इमारतीचे उद्घाटन झाले.
स्वातंत्र्यानंतर 'या' गावात पहिल्यांदाच झाले लालपरीचे आगमन; गावकऱ्यांनी केले थाटामाटात स्वागत
कशी आहे नवी इमारत ?
तब्बल 74 कोटी रुपयांहून अधिक निधी कोल्हापूरच्या नव्या टर्मिनल इमारतीच्या उभारणीसाठी वापरण्यात आला आहे. इमारतीच्या प्रत्येक घटकातून कोल्हापूरच्या संस्कृतीचे दर्शन घडवण्यात आले आहे. कोल्हापूर जिल्ह्यात अनेक गडकिल्ले, वाडे पाहायला मिळतात. त्याच्या रचेनला अनुसरूनच टर्मिनलची नवी इमारत उभारण्यात आली आहेत. बाह्य भाग काळ्या रेखीव दगडांपासून गडकिल्ल्यांच्या प्रवेशद्वाराप्रमाणे बनवण्यात आला आहे. तर बाहेरच्या बाजूला खांबांवर मशाली देखील लावण्यात आलेल्या आहेत.
टर्मिनल इमारतीचे खास आकर्षण
एकूण 3900 चौ.मी क्षेत्रफळाची ही इमारत असून ताशी 500 प्रवासी तर वार्षिक 5 लाख प्रवाशी क्षमता या इमारतीची आहे. कोल्हापूरची नवी टर्मिनल इमारत ही कोल्हापूरची ओळख करून देणारी ठरणार आहे. त्यानुसारच कोल्हापुरातील विविध घटकांची माहिती दर्शवणाऱ्या गोष्टी टर्मिनल इमारतीत प्रवाशांना पाहायला मिळणार आहेत. यामध्ये महाराणी छत्रपती ताराराणी यांचे भव्य छायाचित्र लावण्यात आले आहे. तसेच कोल्हापूरचे वैभव असणारा रंकाळा तलाव, भवानी मंडप पन्हाळा किल्ल्यातील तीन दरवाजा, राधानगरीचे बॅक वॉटर, पैठणी साडी, कोल्हापुरातील कलाकारांनी काढलेल्या पेंटिंग्स देखील लावण्यात आलेल्या आहेत.
देशभरातील 75 वाद्यांचे एकाच सादरीकरणात एकत्रित वादन; अनोख्या सोहळ्याचा पाहा Video
याबरोबरच कोल्हापूर दर्शन घडवणारी करवीर निवासिनी आई अंबाबाई देवी, दख्खनचा राजा जोतिबा, पंचगंगा नदी परिसर, सज्जा कोठी, न्यू पॅलेस, खिद्रापूर आदी चित्रे देखील संपूर्ण टर्मिनल इमारतीत लावण्यात आली आहेत. प्रत्येक चित्राजवळच त्या ठिकाणाची माहिती हेडफोन्सने ऐकून जाणून घेण्याची सोयही करण्यात आली आहे. विशेष म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्याचे भव्य असे छायाचित्र इमारतीच्या संपूर्ण एका बाजूवर रेखाटण्यात आले आहे. कोल्हापूरची खास ओळख असलेल्या कोल्हापुरी चप्पलचे अनोखे स्टॉल देखील टर्मिनल इमारतीच्या एका बाजूला आहेत, अशी माहिती खासदार धनंजय महाडिक यांनी दिली आहे.
मर्दानी खेळ म्हणजेच शिवकालीन युद्धकला, बदलतं स्वरुप का आहे धोकादायक? Video
1939 साली सुरू झाले होते कोल्हापूरचे विमानतळ
लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी कोल्हापूरला रेल्वेने जगाशी जोडले होते. तर त्यांचेच सुपुत्र छत्रपती राजाराम महाराजांनी 1939 साली कोल्हापूरचे विमानतळ वापरासाठी खुले केले होते. तर पुढे 5 मे 1940 रोजी पहिल्या प्रवासी विमानाने कोल्हापुरातून उड्डाण केले होते. राजाराम महाराजांच्या दूरदृष्टीमुळे कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासाला चालना मिळाली होती. म्हणूनच राजाराम महाराजांचे विमानतळाशी संबंधित एक दालनही इमारतीत उभारण्यात आले आहे. यामध्ये प्रवाशांना जुनी छायाचित्रे पाहायला मिळणार आहेत.
दरम्यान, नवीन टर्मिनल इमारत ही कोल्हापूर विमानतळ विकासकामातील पहिला टप्पा आहे. अजूनही विकासकामे या ठिकाणी केली जाणार आहेत. तर कोल्हापूर विमानतळाहून अजून नव्या शहरांसोबत विमानसेवा सुरू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. एकूणच कोल्हापूर विमानतळाच्या विकासामुळे उद्योगवाढीसह पर्यटन, शिक्षण आदी क्षेत्रांना देखील याचा लाभ होणार आहे.