कोल्हापुरातील छत्रपती शाहू महाराज टर्मिनस ते मुंबई रेल्वे प्रवाशांची संख्या मोठी आहे. या मार्गावर वंदे भारत गाडी सुरू करण्याची मागणी गेल्या काही काळापासून होत आहे. या मागणीला रेल्वेकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे येत्या 15 दिवसांत या मार्गावर वंदे भारत सुरू होण्याची शक्यता आहे.
advertisement
कोल्हापूरला दुसरी वंदे भारत
सध्या कोल्हापूर ते पुणे मार्गावर एक वंदे भारत धावत आहे. 16 सप्टेंबर 2024 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत या गाडीचे उद्घाटन झाले. ही गाडी कोल्हापूर-पुणे मार्गावर आठवड्यातून तीन दिवस सुरू करण्यात आली आहे. दर सोमवार, गुरुवार आणि शनिवारी कोल्हापूरहून पुणे तर पुण्याहून कोल्हापूरसाठी दर रविवार, बुधवार आणि शुक्रवारी ही गाडी धावते. या गाडीला प्रवाशांची चांगली पसंती मिळत आहे. त्यातच आता मुंबईसाठी वंदे भारत सुरू होत असल्याने कोल्हापूरसाठी ही दुसरी वंदे भारत असणार आहे.
दरम्यान, कोल्हापूर ते पुणे वंदे भारत गाडीला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळाला. परंतु, ही गाडी फक्त पुण्यापर्यंतच धावत असल्याने व्यापारी, नोकरदार आणि प्रवाशांकडून ती मुंबईपर्यंत नेण्याची मागणी होत होती. या मागणीला आता यश मिळाले असून लवकरच या गाडीचे वेळापत्रक जाहीर होण्याची शक्यता आहे.