कोल्हापूर : देशभरात आजपासून आदिशक्तीचा जागर करत शारदीय नवरात्रौत्सवाला सुरुवात झालीय. महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठापैकी एक असणाऱ्या करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात जिल्हा प्रशासन आणि देवस्थान व्यवस्थापन समितीकडून नवरात्र उत्सवाची तयारी पूर्ण झाली असून, आज सकाळी नऊ वाजता तोफेच्या सलामीने नवरात्रोत्सवाला प्रारंभ झालाय. नवरात्रोत्सवात नऊ दिवसात करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात रोज देवीला वेगवेगळे रूप देण्यात येते.
advertisement
करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या दर्शनाला लाखो भाविक देशभरातून येत असतात. यामुळे आज नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी चक्क पहाटे पासूनच भक्तांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. आज अश्विन शुक्ल प्रतिपदा शारदीय नवरात्र महोत्सव 2024 ची प्रथम दिवसाची श्री कमला लक्ष्मी रूपात अलंकार पूजा बांधण्यात आलीय. आज नवरात्र महोत्सवाच्या पहिल्या दिवशी करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी पद्मासनस्था श्री लक्ष्मी रुपामध्ये सजलेली आहे.
श्रीसुक्तामध्ये वर्णन केलेल्या स्वरुपात बैठी पूजा
दुपारी साडे बाराच्या आरतीनंतर अंबाबाईची श्रीसुक्तामध्ये वर्णन केलेल्या स्वरुपात बैठी पूजा बांधण्यात आली आहे. आई अंबाबाई ही आदिजननी आहे. तिने आपल्या तपोबळावर बिल्ववृक्ष निर्माण केला ज्याची फळे तिला प्रिय आहेत. तिने संपूर्ण सृष्टी निर्माण केलीय. सर्वांना धन, धान्य, पशु, पुत्र, कन्या,फळे, फुले,पाणी, खत, निर्मितीची, सृजनाची क्षमता असेल असे सर्वकाही दिले. श्रीसुक्तामधील अंबाबाई ही हत्ती घोडे, गाईसारख्या पशुंच्या सानिध्याने प्रफुल्लित होते. तिचे आनंद, कर्दम, श्रीद आणि चिक्लीत असे पुत्रवत ऋषि सदैव तिच्या सेवेत असतात असा या पूजेचा अर्थ आहे. ही पूजा श्रीपूजक संजीव मुनीश्वर, सुशांत कुलकर्णी, रवि माईणकर, आशुतोष जोशी यांनी ही सालंकृत पूजा बांधली आहे.
करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीची नवरात्रीत वेगवेगळ्या रूपात पूजा:
शुक्रवार (दि. 4) : गजेंद्रलक्ष्मी
शनिवार (दि. 5) : चंद्रलांबा परमेश्वरी
रविवार (दि. 6) : गायत्री माता
सोमवार (दि. 7) : सरस्वतीदेवी
मंगळवार (दि. 8) : गजारूढ अंबारीतील पूजा
बुधवार (दि. 9) : महाप्रत्यांगीरा
गुरुवार (दि. 10) : दुर्गामाता
शुक्रवार (दि. 11) : महिषासुरमर्दिनी
शनिवार (दि. 12) : रथारूढ
..यावेळी दिली जाते तोफेची सलामी
करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात नवरात्रोत्सव सुरू झाल्यानंतर तसेच अंबाबाई सदरेवर बसताना तोफेची सलामी दिली जाते. गेल्या अनेक दशकांपासून चालत आलेली ही परंपरा आजही पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने जपली आहे. नित्यनियमाने दर शुक्रवारी पालखी सोहळा तसेच आई अंबाबाई जेंव्हा भक्तांच्या भेटीला येत असते तेंव्हा सलामी दिली जाते. पहाटेच्या सुमारास अंबाबाई मंदिराचे दार उघडले जाते. यानंतर श्री पूजकांकडून घटस्थापनेसाठी पूजेची तयारी करण्यात येत असते. यानंतर सकाळच्या सुमारास महाआरती झाल्यानंतर तोफेची सलामी दिली जाते. त्यानंतर कोल्हापुरच्या नवरात्र उत्सवाला प्रारंभ झाला असे जाहीर करण्यात येत असतं आणि अंबाबाई मंदिराच्या गाभाऱ्यात घटस्थापना होत असते. म्हणून या तोफेच्या सलामीला विशेष असे महत्त्व असते.
भाविकांची घेतली जातेय विशेष काळजी
पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती मार्फत भाविकांची सर्वतोपरी काळजी घेत समितीनं सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. यंदा उत्सव काळात सुसज्ज दर्शन मंडप, दर्शन रांगेत पिण्याचे पाणी, लॉकर्स, चप्पल स्टॅन्ड, प्रथमोपचार केंद्र, आपत्ती व्यवस्थापन कक्ष, पोलीस नियंत्रण कक्ष, हिरकणी कक्ष, स्वच्छतागृह अशा सोयी आवारात उभारण्यात आल्या आहेत.
फुलांची सजावट, विद्युत रोषणाईने सजले मंदिर
अंबाबाई मंदिराला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे. झेंडू फुलांच्या माळा, देशीविदेशी जातींच्या फुलांमुळ करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या मंदिरात फुलोत्सव येथे रंगला आहे. यासह मंदिराची शिखरे, भवानी मंडप, प्रवेशद्वाराच्या कमानी, दगडी भिंती यावर केल्या गेलेल्या आकर्षक रंगसंगतीच्या विद्युत रोषणाईने मंदिर अधिकच सुंदर दिसू लागलंय.