कोल्हापूर : डफावर थाप देऊन चढ्या आवाजात एखाद्या शाहिराने दिलेली साद कुणालाही खडबडून जागे करू शकते. अशाच एका कोल्हापूरच्या प्रसिद्ध शिवशाहीराने आपला शाहिरी कलेचा वारसा जपला आहे. तर त्यांच्या दोन्ही मुलींनी देखील बापाच्या पावलावर पाऊल टाकत शाहिरी कला आत्मसात केली आहे. उच्च शिक्षण घेऊन देखील शाहीरा म्हणून कार्यक्रमात त्या दोघी प्रेक्षकांची मने जिंकत असतात.
advertisement
दोन्ही मुलींना शाहिरीचे बाळकडू
शिवशाहीर दिलीप सावंत हे कोल्हापुरातील शाहिरी क्षेत्रातील एक प्रसिद्ध नाव आहे. गेल्या कित्येक वर्षात छत्रपती शिवाजी महाराजांवरील पोवाडे, गोंधळ गात त्यांनी फक्त महाराष्ट्रातच नाही तर भारतभर विविध ठिकाणी कार्यक्रम सादर केले आहेत. तर दीप्ती आणि तृप्ती सावंत या त्यांच्या दोन्ही मुली सध्या आपल्या वडिलांसोबत शाहिरा म्हणून सहभागी होत असतात. महाराष्ट्रातील शाहिरीची परंपरा खूप मोठी आहे. मात्र तरी देखील ही शाहिरीची कला हळूहळू लुप्त होत चालली असल्याची भीती मनात निर्माण झाली. याच कारणाने घरात दोन्ही मुलींना मी शाहिरीचे बाळकडू दिले. याची सुरुवात कोल्हापूरच्या ऐतिहासिक पन्हाळगड आणि किल्ले रायगड यांवरून केली होती, असे शाहीर दिलीप सावंत सांगतात.
दिलीप सावंत यांची मोठी मुलगी दीप्ती सावंत ही उच्चशिक्षित आहे. ऑटोमोबाईल इंजिनीअरिंग डिप्लोमा पूर्ण करून ती सध्या टु व्हिलर मेकॅनिक म्हणून देखील काम करते. मात्र वयाच्या 9 व्या वर्षापासून आपल्या वडिलांकडून शाहीरीचे धडे गिरवत मोठी झाल्याने आपसूकच या क्षेत्रात देखील आवडीने ती सहभागी होत असते. सामाजिक चळवळी, मराठा आरक्षण मोर्चा, स्त्रीशक्ती जागर कार्यक्रमांमध्ये, अंबाबाई मंदिर, रायगड, पन्हाळगड यासह मुंबई, औरंगाबाद, गोवा अशा अनेक ठिकाणी सादरीकरण करत आल्याचे दीप्ती सावंत सांगतात.
तर तृप्ती सावंत ही दिलीप सावंत यांची दुसरी कन्या आहे. ती सध्या डीएडचे शिक्षण घेत असून त्यासोबतच बीएची पदवी देखील दुरशिक्षणाच्या माध्यमातून घेत आहे. शाहीर लहरी हैदर, पिराजीराव सरनाईक अशी कोल्हापूरची शाहिरी परंपरा मोठी आहे. यांच्याबरोबरच माझे वडिलांकडून देखील ही परंपरा जगभर पोहचवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यातच लहानपणापासून मला त्यांनी शाहिरीचे बाळकडू दिले आहे. फक्त एक महिला शाहीर आहे म्हणून नाही, तर शिवविचारांचा वारसा पुढे नेण्याचं काम करत असल्याचा अभिमान वाटतो, असे मत तृप्ती सावंत यांनी व्यक्त केले आहे.
दरम्यान या बापलेकिंनी चालवलेला शाहिरी कलेचा वारसा असाच पुढे अखंडित राहो अशाच भावना कलाकार आणि प्रेक्षक व्यक्त करत असतात.