जशी कागदपत्रांची फेरतपासणी सुरू झाली, तक्रारी समोर आल्या तसं हळूहळू एक एक घोटाळे समोर आले आणि आता घोटाळ्यातही घोटाळा झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. सरकारी महिला कर्मचाऱ्यांनीच लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला आहे. अशा तब्बल 8 हजारहून अधिक महिला आहेत. तर सरकारी सेवेतून निवृत्त झालेल्या महिलांनी देखील या योजनेचा लाभ घेतला आहे. त्यांची आकडेवारी देखील हजारहून अधिक आहे.
advertisement
याआधी लाडक्या भावांनी फेक खाती आणि कागदपत्र जमा करून लाडक्या बहिणींचे पैसे लाटले. 14 हजारहून अधिक भावांनी महिलांचे पैसे लाटल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 'लोकमत'ने दिलेल्या वृत्तानुसार आता 8214 महिला सरकारी कर्मचाऱ्यांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला आहे. जवळपास 8 ते 10 महिने त्यांनी हा फायदा घेतला आहे. या महिला तीन आणि चार वर्गातील सरकारी कर्मचारी असल्याची माहिती मिळाली आहे.
या महिला कर्मचाऱ्यांवर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. तसंच लाडक्या भावांनी ज्या बहिणींच्या पैशांवर डल्ला मारला आहे त्यांच्यावर काय कारवाई करायची ते मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बोलून निर्णय घेऊ असं आदिती तटकरे यांनी माहिती दिली होती.
याआधी लाडकी बहीण योजनेत न बसणाऱ्या महिलांची नावं योजनेतून वगळण्यात आली होती. ज्या महिलांकडे दुचाकी आहे, एकापेक्षा जास्त सरकारी योजनांचा लाभ घेत आहेत किंवा ज्या कुटुंबातील महिला दोन पेक्षा जास्त महिला या योजनेचा लाभ घेत आहेत त्यांची नाव यापूर्वीच बाद करण्यात आली होती. एकीकडे नियम कठोर केले जात असताना अशा पद्धतीनं दुसरीकडे पैसे लाटले जाणं हे वाईट असून याबद्दल महिलांनी संताप व्यक्त केला आहे. आता सरकार या महिलांकडून पैसे परत घेणार की आणखी काही कारवाई करणार ते पाहावं लागणार आहे.