अखिल भारतीय छावा संघटनेचे युवक प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे पाटील यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण आणि त्यांच्या कार्यकर्त्यांकडून झालेल्या मारहाणीच्या पार्श्वभूमीवर लातूरमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या घटनेचा तीव्र निषेध करत छावा संघटना आक्रमक झाली असून लातूर बंदची हाक देण्यात आली आहे.
विशेष म्हणजे, या बंदला सर्वपक्षीय पाठिंबा मिळत असून भाजप, शिवसेना, काँग्रेससह अन्य पक्षांनी बंदला पाठिंबा दर्शवत आपापल्या पदाधिकाऱ्यांमार्फत सहभागाचं आवाहन केलं आहे. त्यामुळे लातूर पूर्णतः बंद राहण्याची शक्यता आहे.
advertisement
छावाच्या पदाधिकार्याला लाथा-बुक्क्यांनी तु़डवलं...
कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंचा विधिमंडळाच्या सभागृहात रमी खेळतानाचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडीओवर संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या पत्रकार परिषदेमध्ये छावा संघटनेचे पदाधिकारी कोकाटेंच्या निषेधार्थ निवेदन देण्यासाठी पत्रकार परिषदेत पोहचले. यावेळी त्यांनी सुनिल तटकरे यांना निवेदन देताना पत्तेही दिले. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवकच्या कार्यकर्त्यांनी छावा संघटनेच्या विजयकुमार घाडगे पाटील यांना बेदम मारहाण केली. घाडगे पाटील हे या मारहाणीत जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.