शरीरावर मारहाणीच्या खुणा
मिळालेल्या माहितीनुसार, टाका (ता. औसा) येथील रहिवासी असलेल्या अनुष्का किरण पाटोळे या विद्यार्थिनीच्या मृत्यूने अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन प्रक्रिया सुरू असतानाच, संतापलेल्या महिलांनी साड्या आणि कपड्यांचा दोर म्हणून वापर करून रस्ता अडवला. घटनेच्या आदल्या रात्री एका महिला पर्यवेक्षिकेने अनुष्काला मारहाण केली होती आणि तिच्या शरीरावर मारहाणीच्या खुणा आढळल्या आहेत, अशी प्राथमिक माहिती पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी दिली आहे. या माहितीमुळे नातेवाईकांचा राग अधिकच अनावर झाला.
advertisement
...तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही
गेल्या दोन दिवसांपासून अनुष्काचे नातेवाईक न्यायासाठी ठाम भूमिकेवर आहेत. जोपर्यंत दोषींवर गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा त्यांनी घेतला आहे. गांधी चौकातील आंदोलनावेळी महिलांचा आक्रोश पाहून उपस्थितांचेही डोळे पाणावले होते. जवळपास एक तास चाललेल्या या आंदोलनामुळे शहराची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. अखेर पोलिसांनी मध्यस्थी करून दोषींवर योग्य कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले आणि वाहतूक सुरळीत झाली.
तुमची मुलगी आजारी, लवकर या...
विद्यालय प्रशासनाने घटनेची माहिती कुटूंबियांना आधी दिली नाही. तुमची मुलगी आजारी आहे, असं सांगून त्यांना बोलावून घेतलं. त्यानंतर मुलीला लातूरच्या सरकारी रुग्णालयात नेण्यात आलं. त्यानंतर तुमच्या मुलीने आत्महत्या केल्याचं पालकांना सांगण्यात आलं, अशी माहिती समोर आली आहे. प्रशासन काहीतरी लवपण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप नातेवाईकांकडून करण्यात येतोय.
