कर्मचाऱ्यांचा हलगर्जीपणा स्पष्ट
याच संशयावरून शाळेतील आया लता गायकवाड आणि वॉर्डन पल्लवी कणसे यांनी अनुष्काला सर्वांसमोर बेदम मारहाण केली होती. अनुष्काच्या मैत्रिणींनी दिलेला जबाब या घटनेतील क्रूरता आणि कर्मचाऱ्यांचा हलगर्जीपणा स्पष्ट करणारा आहे. मारहाण झाली त्या दिवशी अनुष्का दिवसभर कुणाशीही बोलली नव्हती आणि ती रडतही नव्हती, ती केवळ प्रचंड निराश होती. तिचा हा बदललेला स्वभाव पाहून तिच्या मैत्रिणींना काहीतरी अघटित घडण्याची भीती वाटली होती.
advertisement
जर महिला कर्मचाऱ्यांनी आमचे ऐकले असते, तर...
त्यांनी वॉर्डन आणि आया यांना विनंती केली होती की, "आज अनुष्काची काळजी घ्या, तिला एकटे सोडू नका आणि तिला सोबत घेऊन झोपा." मात्र, या महिला कर्मचाऱ्यांनी मुलींच्या या सूचनेकडे सपशेल दुर्लक्ष केले आणि कोणतीही खबरदारी घेतली नाही. "जर महिला कर्मचाऱ्यांनी आमचे ऐकले असते, तर आज आमची मैत्रीण जिवंत असती," अशी काळजाला भिडणारी भावना तिच्या मैत्रिणींनी व्यक्त केली आहे.
अनुष्का ज्या रुममध्ये राहायची...
अनुष्का ज्या रुममध्ये राहायची, त्याच खोलीत वॉर्डन आणि आया यांचेही वास्तव्य होते, तरीही त्यांनी मुलीचे म्हणणे ऐकले नाही. केवळ संशयावरून एका विद्यार्थिनीला सर्वांसमोर मारहाण करून तिचा मानसिक छळ करणे हे कायद्याने गुन्हा असतानाही, या वॉर्डनने अधिकाराचा गैरवापर केल्याचे स्पष्ट झाले आहे. पालकांच्या तक्रारीनंतर आता या दोन्ही महिला आरोपींना पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.
गेल्या 2 वर्षात तिसरी मोठी घटना
लातूरच्या या नवोदय विद्यालयातील गंभीर घटनांची ही मालिका आता पालकांसाठी चिंतेचा विषय ठरली आहे. मार्च 2024 मध्ये एका शिक्षकाने मुलांचे शोषण केल्याचा प्रकार येथे घडला होता. त्यानंतर केवळ 6 महिन्यांपूर्वी स्वच्छतागृहाचे पाणी पिण्याच्या पाण्यात मिसळल्याने 100 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आली होती. आता अनुष्काच्या आत्महत्येच्या रूपाने गेल्या 2 वर्षात तिसरी मोठी घटना समोर आली असून, या वारंवार घडणाऱ्या प्रकरणांमुळे शाळेच्या व्यवस्थापनावर कठोर कारवाईची मागणी होत आहे.
