या प्रचारात भाजपच्या वतीने आघाडी घेतल्याचे जाणवले. भाजपच्या वतीने सुधाकर शृंगारे यांच्या प्रचारासाठी दिग्गज नेत्यांनी लातूर जिल्ह्यात सभा घेतल्या, आधी चंद्रशेखर बावन्नकुळे, चित्रा वाघ, विनोद तावडे यांच्या सभा झाल्या त्यानंतर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभा झाल्या, शेवटी नितीन गडकरी यांची देखील सभा झाली. दुसरीकडे काँग्रेसच्या उमेदवारासाठी बाळासाहेब थोरात, सुषमा अंधारे आणि प्रियांका गांधी यांच्या सभा झाल्या. त्यामुळे प्रचारात भाजप मात्र आघाडीवर असल्याचं चित्र पाहायला मिळालं.
advertisement
मतदानाची टक्केवारी सध्याची आणि 2019
सात मे रोजी लातूर लोकसभा मतदार संघात एकूण 62.59 टक्के एवढं मतदान झाले. 2019 साली 62.14 एवढेच मतदान झाले होते. गेल्या वेळेपेक्षा यावेळी मतदानाचा टक्का वाढलाय, तसेच नवमतदारांनी देखील उत्स्फूर्तपणे आपल्या पहिल्या मतदानाचा हक्क बजावला आहे. त्यामुळे मतदानाची ही वाढलेली टक्केवारी नेमकी कोणत्या उमेदवारासाठी घातक ठरणार हे मात्र येत्या चार जून रोजीच स्पष्ट होणार आहे.
प्रचारातील कळीचे मुद्दे
लातूर लोकसभा मतदारसंघात नेहमी पाणी, उद्योग आणि रोजगार हेच कळीचे मुद्दे असतात, मात्र यावेळी लातूरला जिल्हा रुग्णालयाची निर्मिती हा देखील कळीचा मुद्दा ठरलाय. लातूर लोकसभा मतदार संघात नेहमीच पाऊसमान कमी असल्याने पिण्याचे पाणी आणि शेतीसाठी पाणी हा कळीचा मुद्दा राहिला आहे. जिल्ह्याची तहान लहानमोठ्या प्रकल्पांवर आधारलेली आहे, तर लातूर शहराची तहान मांजरा प्रकल्पावर आधारलेली आहे. एकूणच बीड आणि धाराशिव जिल्ह्याच्या सीमेवर जर पाऊस झाला तर लातूर शहराला पाणी मिळतं अशी परिस्थिती आहे. याशिवाय लातुरात रेल्वेचा बोगी कारखाना उभारण्यात आला असला तरी अजूनही म्हणावा तसा वेग कामाला आलेला नाही. त्यामुळे त्याठिकाणी स्थानिक रोजगाराचा मुद्दा अजून कायम आहे. तसेच मोठे ईतर उद्योग नसल्यामुळे स्थानिक तरुणांना रोजगारासाठी बाहेर जिल्ह्यात जावं लागते. या मुद्द्यांसोबतच लातूर जिल्ह्याला गेल्या 25 वर्षांपासून जिल्हा रुग्णालयच उपलब्ध नाही. त्यामुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयावर रुग्णांचा ताण पडतोय. शिवाय याठिकाणी सुविधांचा देखील मोठ्या प्रमाणात अभाव असल्यामुळे लातूरला जिल्हा रुग्णालय व्हावे अशी लातूरकरांची मागणी आहे.
राजकीय परिस्थिती
लातूरची एकूण राजकीय परिस्थिती पहिली तर, लातूर जिल्हा हा नेहमीच काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जायचा. लातूर लोकसभा मतदार संघातून तब्बल सात वेळा काँग्रेसचे जेष्ठ नेते शिवराज पाटील चाकूरकर यांनी विजय मिळवत सलग सात वेळा प्रतिनिधित्व केले. मात्र 2004 मध्ये भाजपच्या रूपाताई पाटील निलंगेकर यांनी शिवराज पाटील चाकूरकरांचा विजयी रथ थांबवला. त्यानंतर पुन्हा एकदा स्व. विलासराव देशमुख यांनी लातूर लोकसभा मतदार संघावर पकड मजबूत केली. त्यांनी देखील केंद्रात अवजड उद्योग मंत्री पद भूषवले. लातूर लोकसभा मतदारसंघ राखीव झाल्यानंतर विलासरावांनी कोल्हापूरच्या जयवंत आवळे यांना लातुरात आणून निवडून देत आपला करिष्मा दाखवला. मात्र, विलासराव देशमुख यांच्या निधनानंतर भाजपनं पुन्हा एकदा हादरा देत काँग्रेसचा बालेकिल्ला काबीज केला.
अर्थातच त्यावेळी मोदींची हवा मोठ्या प्रमाणात लातूर लोकसभा मतदार संघात देखील पाहायला मिळाली. पुन्हा मोदींचे तेच वादळ 2019 च्या लोकसभा निवडणुकीत देखील पाहायला मिळाले. भाजपच्या सुधाकर शृंगारे यांनी काँग्रेसचे उमेदवार मछिंद्र कामत यांचा सुमारे तीन लाखांच्या मताधिक्याने पराभव करत लातुरात भाजपचे स्थान मजबूत केले. यावेळी देखील भाजपने लातूर लोकसभा मतदार संघावर आपला झेंडा कायम ठेवण्यासाठी जोर लावलाय. त्यामुळं भाजपचे विद्यमान आमदार संभाजी पाटील निलंगेकर, अभिमन्यू पवार आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे कॅबिनेट मंत्री संजय बनसोडे यांनी आपली प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लावली आहे. तर काँग्रेसकडून आमदार अमित देशमुख आणि आमदार धिरज देशमुख यांनी देखील डॉ. काळगे यांच्यासाठी आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे.
जातीय समीकरण
अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या मतदार संघात भाजपने नेहमीप्रमाणे सरळ स्वरूपाचे गणित घालत दलित असलेल्या सुधाकर शृंगारे यांना उमेदवारी देत दलित समाजाची मते एकगठ्ठा स्वरूपात मिळविण्यासाठी प्रयत्न केलेत. मात्र, दुसरीकडे जातीय समीकरणांची चांगलीच सांगड घालण्याचा प्रयत्न काँग्रेसने केला आहे. जातीने माला जंगम असलेल्या डॉ. शिवाजी काळगे यांना उमेदवारी देऊन लिंगायत मते आपल्याकडे वळविण्याची खेळी काँग्रेसने केली आहे. याचं कारण म्हणजे लिंगायत समाज हा जंगम समाजाला आपला गुरु मानतो. त्यामुळे काँग्रेसनं हे जातीचं समीकरण जुळवलंय. याशिवाय अमित देशमुखांमुळे मराठा समाजाची मते मिळतील तर मुस्लिम समाज देखील नेहमी प्रमाणे काँग्रेसच्या पाठीशी राहील असा अंदाज लावत काँग्रेसने हे जातीय समीकरण जुळवलं असल्याची चर्चा आहे.
वाचा - 'मोदींच्या नेतृत्वात पांडव तर समोर कौरवांमध्ये..' शेवटच्या सभेत फडणवीस काय म्हणाले?
प्रचारात कुणाची आघाडी
एकूणच जर पाहायला गेलं तर 2019 च्या निवडणुकीप्रमाणेच या निवडणुकीत देखील प्रचारात भाजपची आघाडी कायम असलेली पाहायला मिळाली आहे. प्रत्येक गावात आणि तालुक्यात कार्यकर्ता मेळावे असतील, कॉर्नर बैठका असतील किंवा रॅली, रोड शो असतील यात भाजप कुठेही मागे राहिली नाही. शिवाय भाजपने प्रचारासाठी दिग्गज नेत्यांची रांगच लावली होती. तर सर्वात मोठी सभा म्हणून पंतप्रधान मोदींच्या सभेचा उल्लेख केला जातोय. याप्रमाणे जर काँग्रेसच्या प्रचाराकडे पहिले तर पहिली सभा बाळासाहेब थोरात आणि सुषमा अंधारे यांची झाली तर दुसरी मोठी सभा प्रियांका गांधी यांची झाली, याशिवाय शहरात रॅली आणि रोड शो हे कांही प्रमाणातच पाहायला मिळाले. त्यामुळे प्रचारात काँग्रेस थोडं बँक फुटवर गेल्याचे पाहायला मिळाले.
2019 च्या निवडणुकीची पार्श्वभूमी आणि बदललेलं राजकीय समीकरण
2019 च्या निवडणुकीत भाजप आणि काँग्रेस यांच्यात थेट लढत झाली होती. त्यावेळी मतदार संघात वंचित बहुजन आघाडीचं अस्तित्व फारसं दिसणारं आणि प्रभावी ठरलं नाही, मात्र यावेळी मतांची विभागणी व्हावी यासाठी वंचितनं देखील जातीय गणित मांडत मातंग समाजाच्या मतांची विभागणी करण्यासाठी नरसिंग उदगीरकर यांना उमेदवारी देऊन एक मातंग समाजाचा चेहरा समोर आणत मातंग आणि मुस्लिमांची मतांची विभागणी होऊन वंचितला फायदा मिळावा यासाठी प्रयत्न केलाय. मात्र वंचितचा हा फॉर्मुला किती फायद्याचा ठरेल हे स्पष्ट होण्यासाठी अजून वेळ असला तरी काँग्रेसला मात्र यावेळी भाजपच्या विजयाची हॅटट्रिक रोखण्यासाठी संधी मिळाली आहे. शिवाय याआधी मोदींची हवा आणि जादू काही प्रमाणात कमी झाल्यानं काँग्रेसच्या आशा उंचावल्या आहेत तर भाजपने देखील या निवडणुकीत मोठा गाजावाजा केलाय. त्यामुळं यावेळस राजकीय समीकरण थोडं फार बदललं असलं तरी यांचा नेमका परिणाम कसा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
वाचा - बारामती लोकसभा निकालाआधीच उधळला होता गुलाल! आता थेट अभिनंदनाचे लावले बॅनर
2019 मध्ये 62.14 टक्के मतदान
प्रमुख लढत
सुधाकर शृंगारे ( भाजप ) - पडलेली मते - 6 लाख 61 हजार 415 - 56.22 टक्के
मछिंद्र कामत ( काँग्रेस ) - पडलेली मते - 3 लाख 72 हजार 368 - 31.64 टक्के
विजयी उमेदवार - सुधाकर शृंगारे ( भाजप )
लातूर लोकसभा मतदारसंघ 2024
एकूण उमेदवार - 28
मतदान टक्केवारी - 62.59 टक्के
लातूर ग्रामीण - 65.28 टक्के
लातूर शहर - 60.77 टक्के
अहमदपूर - 63.12 टक्के
उदगीर - 63.31 टक्के
निलंगा - 62.02 टक्के
लोहा - 61.24 टक्के
एकूण मतदार - 19 लाख 77 हजार 42
झालेले मतदान - 12 लाख 37 हजार 355
पुरुष मतदार - 6 लाख 64 हजार 630
महिला मतदार - 5 लाख 72 हजार 700
तृतीयपंथी - 25
