अभिजीत पोते, प्रतिनिधी, पुणे : ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांना पैशांची ऑफर दिल्याचा दावा करणारी ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे. या व्हायरल क्लिपवरून लक्ष्मण हाके यांच्यावर टीकास्त्र सोडले जात असताना दुसरीकडे आता त्यांनीच या प्रकरणावरील मौन सोडले आहे. व्हायरल होणाऱ्या ऑडिओ क्लिपवर लक्ष्मण हाके यांनी आपली पहिली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. आपण चुकीचे असल्यास तुरुंगात डांबा असे आव्हान त्यांनी दिले आहे.
advertisement
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. हाके यांनी स्पष्ट केले की, व्हिडिओत दाखवलेली दोन्हीकडची नंबर्स आहेत. कुणाला वाटत असेल की आम्ही पैसे घेतले आहेत किंवा कायदा भंग केला आहे, तर आम्हाला उचलून जेलमध्ये टाका असे आव्हान त्यांनी दिले.
हाके यांनी पुढे म्हटले की, आम्ही ओबीसींची चळवळ उभी करत आहोत. रात्रंदिवस ओबीसींसाठी धावपळ करत आहोत, मेळावे आणि आंदोलन करत आहोत. काही लोक उदार अंतकरणाने मदत करत आहेत, पण त्याचे रेकॉर्डिंग करून व्हायरल करणे हे फक्त बदनामी करण्याचे आणि आंदोलन थांबवण्याचे कटकारस्थान असल्याचा आरोप त्यांनी केला.
लक्ष्मण हाके यांनी पुढे म्हटले की, “या व्हिडिओला मी जास्त किंमत देत नाही. अनेक दिवसांपासून माझ्यावर वेगवेगळे हल्ले आणि आरोप होत आहेत. मी ओबीसींसाठी आवाज उठवत आहे आणि माझी बदनामी होत असेल तरी मी थांबणार नाही. ओबीसींची चळवळ मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रात उभी राहणार असल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
प्रकरण काय?
ऑडिओ क्लिपमधील एका तरुणाने लक्ष्मण हाके यांना सामाजिक कार्यात पाठबळ देण्यासाठी पैशांची ऑफर दिली. पेट्रोल साठी आपण तुम्हाला पैसे देऊ इच्छित आहे. तुम्हाला पैसे कसे देऊ, कॅशमध्ये द्यायचे की फोन पे, गूगल पे वर देता येईल? असं तरुणाने विचारलं. यावर हाके यांनी तुम्ही भेटायला या, असं सांगितलं. पण तरुणाने फोनवरच ऑफर दिली. यानंतर हाके यांनी ऑफर स्विकारली. आणि आपल्या ड्रायव्हरचा यूपीआय नंबर दिला.