जामखेड : जामखेड नगरपरिषद निवडणूक ही केवळ स्थानिक स्वराज्य संस्थेपुरती मर्यादित न राहता राज्याच्या राजकारणात लक्षवेधी ठरली होती. या निवडणुकीत भाजपचे ज्येष्ठ नेते आमदार राम शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्यात थेट राजकीय सामना रंगला. दोन्ही नेत्यांनी प्रचारात मोठी ताकद पणाला लावत एकमेकांवर जोरदार टीका केली, त्यामुळे संपूर्ण निवडणूक राज्यभर चर्चेचा विषय ठरली.
advertisement
प्रांजल चिंतामणी विजयी, रोहित पवारांना धक्का
अखेर मतमोजणीअंती भारतीय जनता पार्टीने जामखेड नगरपरिषदेत स्पष्ट बहुमत मिळवत सत्ता आपल्या ताब्यात घेतली. भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार प्रांजल चिंतामणी यांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला. नगरपरिषदेच्या एकूण जागांपैकी भाजपाने १५ जागांवर यश संपादन करून निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले. राष्ट्रवादी काँग्रेसला ९ जागांवर समाधान मानावे लागले, तर बहुजन वंचित आघाडीला केवळ २ जागा मिळाल्या.
या निकालानंतर जामखेडच्या राजकारणात राम शिंदेंचे वजन पुन्हा एकदा वाढल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. या विजयामागे राम शिंदेंची प्रभावी रणनीती, संघटनात्मक बांधणी आणि कार्यकर्त्यांचे जाळे निर्णायक ठरल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. नवनिर्वाचित नगराध्यक्ष प्रांजल चिंतामणी यांनी जनतेने दाखवलेल्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही, विकासाला सर्वोच्च प्राधान्य दिले जाईल, अशी ग्वाही दिली आहे.
नगराध्यक्ष पदासाठी झालेल्या थेट लढतीत भाजपकडून प्रांजल चिंतामणी, तर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) कडून संध्या शहाजी राळेभात मैदानात होत्या. प्रचाराच्या काळात दोन्ही बाजूंनी जोरदार सभा, पदयात्रा आणि आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरू होती.
एक विधान अन् निकाल फिरला
दरम्यान, निवडणूक प्रचारात आमदार रोहित पवारांचे समर्थक सूर्यकांत मोरे यांच्या भाषणामुळे वातावरण अधिकच तापले. प्रचार सभेत त्यांनी विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्यावर उडालेल्या बल्बचे सभापती असा आक्षेपार्ह शब्दप्रयोग केला. या वक्तव्याचे पडसाद थेट विधानसभेत उमटले. भाजपच्या सदस्यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत सूर्यकांत मोरे यांच्याविरोधात हक्कभंगाची नोटीस बजावली.
विधानसभेत प्रकरण गाजलं नुकत्याच पार पडलेल्या हिवाळी अधिवेशनात सूर्यकांत मोरे यांच्या विधानावर चर्चा झाली होती. आणि यावेळी सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात खडाजंगी देखील पाहायला मिळाली होती. भाजपकडून हक्क भंगाचा प्रस्ताव आणण्यात आला होता.
विशेष म्हणजे, मागील विधानसभा निवडणुकीत रोहित पवारांकडून निसटता पराभव स्वीकारावा लागलेल्या राम शिंदेंसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची होती. त्या पराभवानंतरही त्यांनी जामखेड तालुक्यातील सहकार संस्था आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पुन्हा प्रभाव निर्माण केला. नगरपरिषद निवडणुकीत त्यांनी सर्व ताकद पणाला लावली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा देखील भाजपसाठी निर्णायक ठरली.
