अहिल्यानगर : राहाता नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 2 डिसेंबर रोजी मतदानाची प्रक्रिया पार पडली असून, संपूर्ण शहरात प्रचंड चुरशीचे वातावरण पाहायला मिळाले. नगराध्यक्षपदासह नगरसेवक पदासाठी कोणाची निवड होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मतदानाच्या दिवशी सकाळपासूनच मतदारांमध्ये उत्साह दिसून आला. विविध प्रभागांमध्ये मतदारांनी मोठ्या प्रमाणात मतदानाचा हक्क बजावला, त्यामुळे निकालाबाबत उत्कंठा अधिकच वाढली होती. अशातच आता निकाल समोर आला असून महायुतीच्या 20 पैकी 19 जागा निवडून आल्या आहेत. तर नगराध्यक्षपदाचे उमेदवार डॉ. स्वाधिन गाडेकर विजयी झाले.
advertisement
गाडेकर विरुद्ध गाडेकर लढत
या निवडणुकीत नगराध्यक्षपदासाठी मुख्यतः दोन गटांमध्ये थेट सामना रंगला आहे. विखे पाटील गटाकडून डॉ. स्वाधिन गाडेकर तर लोकक्रांती सेनेकडून धनंजय गाडेकर हे प्रमुख उमेदवार रिंगणात आहेत. दोन्ही उमेदवारांनी प्रचारादरम्यान शहरातील प्रत्येक प्रभागात जाऊन मतदारांशी थेट संवाद साधला. विकासकामे, पायाभूत सुविधा, पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता आणि शहराच्या सर्वांगीण प्रगतीचे मुद्दे प्रचारात केंद्रस्थानी होते. त्यामुळे ही निवडणूक केवळ व्यक्तींची नाही तर दोन विचारधारांमधील लढत असल्याचे चित्र दिसून आले.
राहाता नगरपरिषदेत एकूण 20 जागांसाठी ही निवडणूक झाली आहे. विखे पाटील गट आणि लोकक्रांती सेना या दोन्ही प्रमुख राजकीय गटांनी प्रत्येकी सर्व 20 जागांवर आपले उमेदवार उभे केले होते. याशिवाय अन्य पक्षांचे तसेच अपक्ष उमेदवारांनीही निवडणुकीत मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला. नगराध्यक्षपदासाठी एकूण 7 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते, तर नगरसेवक पदासाठी तब्बल 78 उमेदवार रिंगणात होते. त्यामुळे ही निवडणूक अत्यंत बहुरंगी आणि अटीतटीची ठरली.
