मुंबईकरांचा कल सीएनजीकडे!
सीएनजीचा खर्च कमी आणि पर्यावरणपूरक प्रवासाचा फायदा असल्यामुळे नागरिकांचा कल सीएनजीकडे वाढला आहे. मुंबई आणि आसपासच्या भागात सध्या सुमारे 10 लाखांहून अधिक सीएनजी वाहने आहेत. कोरोनानंतर सीएनजी वाहनांच्या नोंदणीत 25 ते 35 टक्क्यांची वाढ झाल्याची माहिती आरटीओ विभागाने दिली आहे.
तरीही मुंबई शहरातील अनेक भागांमध्ये अजूनही सीएनजी पाइपलाइन पोहोचलेली नाही. त्यामुळे अनेक पंप टँकरवर अवलंबून आहेत. टँकरचा पुरवठा वेळेवर न झाल्यास पंपांवर इंधन उपलब्ध राहत नाही आणि वाहनचालकांना जास्त वेळ थांबावे लागते. काही पंपांवर तर इंधन भरण्याआधी अर्धा ते एक तास प्रतीक्षा करावी लागते.
advertisement
सीएनजी भरण्यास फक्त काही मिनिटे लागतात पण नंबर येण्यासाठी खूप वेळ वाट पाहावी लागते असे वाहनचालक महेश पाटील यांनी सांगितले. पंप मालक प्रदीप शाह म्हणाले वाहनसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे सीएनजी पंपांची संख्या वाढविणे अत्यंत गरजेचे झाले आहे. तांत्रिक अडचणींमुळेही कधी कधी विलंब होतो.
भविष्यात स्मार्ट उपाय करण्याची मागणी!
वाहनचालक आणि पंपचालक दोघांच्याही मते वाढत्या मागणीचा ताण कमी करण्यासाठी शहरात अधिक सीएनजी पंप उभारणे आवश्यक आहे. त्याचबरोबर ऑनलाइन पंप आरक्षण प्रणाली सुरू केल्यास वाहनचालकांचा वेळ वाचेल. मुंबईतील वाढत्या वाहने आणि मर्यादित पायाभूत सुविधा लक्षात घेता, प्रशासनाने या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे
