परभणी शहरात काही दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ असलेल्या भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करण्यात आली. त्यानंतर परभणी बंदचे आयोजन करण्यात आले. या बंदला अचानक हिंसक वळण लागले. या हिंसाचारानंतर पोलिसांनी कॉम्बिंग ऑपरेशन केले. यामध्ये सोमनाथ सुर्यवंशी या तरुणाचा पोलीस कोठडीत मृत्यू झाला. या घटनेमुळे राज्यात मोठा संताप व्यक्त होत आहे. परभणी आणि बीड घटनेवरुन विरोधक आक्रमक झाले. विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचं आंदोलन केले. त्यानंतर विरोधकांनी सभागृहात मुद्दा उपस्थित केला.
advertisement
विरोधकांचा गंभीर आरोप...
काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांनी सरकारवर गंभीर आरोप केला. परभणी बाबत चर्चा आजच घेण्याची मागणी पटोले यांनी केली. पोलिसांच्या ताब्यात असलेल्या एका तरुणाचा मृत्यू झाला असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. परभणीत हिंसाचार सुरू असताना दुसरीकडे पोलिसांनी काहीच कारवाई केली नाही. हिंसाचाराच्या चार तासानंतर पोलिसांनी कारवाई केली. हिंसाचार भडकण्याची पोलीस वाट पाहत होते का, असा सवाल त्यांनी केला. परभणी, बीडच्या मुद्यावर सरकार गंभीर नसल्याचा आरोपही त्यांनी केला.
विधानसभा अध्यक्षांचे निर्देश...
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आजच्या ऐवजी उद्या सभागृहात चर्चा होईल असे सांगितले. या विषयावर विरोधी आणि सत्ताधारी बाकांवरील सदस्य या प्रकरणावर बोलतील. सरकारने या मुद्यांवर निवेदन सादर करावे असे निर्देश विधानसभा अध्यक्षांनी दिले.\
