विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर जळगाव जिल्ह्यातील सर्व 11 आमदार मुंबईला रवाना झाले असून, लवकरच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्रिपदासह मंत्र्यांचाही शपथविधी सोहळा पार पडणार आहे.त्यामुळे नवीन सरकारमध्ये जिल्ह्यातील किती आमदारांना मंत्रिपदाची संधी मिळते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
शिंदे सरकारच्या काळात जळगाव जिल्ह्याला 3 कॅबिनेट मंत्रीपदे मिळाली होती. यामध्ये शिंदे सेनेचे गुलाबराव पाटील,भाजपचे विद्यमान मंत्री गिरीश महाजन आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार अनिल पाटील यांना कॅबिनेट मंत्रीपदाची संधी मिळाली होती. आता या नेत्यांना पुन्हा संधी मिळणार असल्याचे मानले जात आहे. तर सुरेश भोळे, किशोर पाटील, मंगेश चव्हाण संजय सावकारेंसह एकूण सात जणांची नावे चर्चेंत आहेत.
advertisement
जळगाव शहराचे आमदार सुरेश भोळे हेही स्पर्धेत आहेत, ते तिसऱ्यांदा विजयी झाले आहेत. त्यातच लेवा पाटील समाजाचे असल्याने, भाजपकडून त्यांना संधी दिली जाण्याचीही शक्यता आहे. तसेच पाचोऱ्याचे किशोर पाटील हेही तिसऱ्यांदा विजयी झाले आहेत. शिवसेनेतील फुटीनंतर किशोर पाटील हे सर्वात आधी एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले होते. त्यामुळे त्यांचेही नाव मंत्रीपदासाठी चर्चेत आहे.
चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण हे भाजपमधील नवीन नेतृत्व म्हणून पुढे आले आहे. अमित शाह यांच्या चाळीसगावमधील सभेत नव्या मंत्रिमंडळात चव्हाण यांना स्थान असल्याची घोषणा त्यांनी केली होती. त्यातच चव्हाण हे फडणवीस व महाजन यांचेही निकटवर्तीय मानले जातात.
भुसावळचे आमदार संजय सावकारे हे सलग चौथ्यांदा विजयी झाले आहेत. त्यांनी या आधी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सरकारमध्ये जळगावचे पालकमंत्रीपदही भूषविले आहे. त्यामुळे त्यांचे नावही मंत्रिपदाच्या स्पर्धेत आहे.
