बीड लोकसभा मतदार संघात जरांगे फॅक्टरमुळेच पंकजा मुंडे यांचा पराभव झाला होता. यानंतर आता बीड विधानसभा मतदार संघात पुन्हा जरांगे फॅक्टर दिसणार आहे. कारण बीडमध्ये मनोज जरांगे पाटील यांचे निकटवर्तीय आणि मराठा क्रांती मोर्चा समन्वयकांनी अपक्ष उमेदवार अनिल जगताप यांना पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडीचे उमेदवार असलेल्या क्षीरसागर बंधूंना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.
advertisement
मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर बीडमध्ये सर्व उमेदवारांना उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यात अपक्ष म्हणून अनिल जगताप आणि ज्योती मेटे यांचा उमेदवारी अर्ज कायम होता. तसेच ऐनवेळी जो उमेदवार रेस मध्ये असेल त्याच्या पाठीमागे उभे राहू,अशा सूचना मनोज जरांगे पाटील यांनी केल्या होत्या. त्यानंतर समाजाने बैठक घेत अनिल जगताप यांना पाठिंबा दिला आहे.
विशेष म्हणजे मातब्बर पक्षांनी मराठा उमेदवार नाकारल्यानंतर अपक्ष असलेल्या उमेदवाराला पाठिंबा देऊन निवडून आणण्याचा विश्वास मराठा समन्वयकांनी व्यक्त केला. प्रस्थापित क्षीरसागर कुटुंबाला हद्दपार करण्याची भाषा देखील यावेळी मराठा समन्वयकांनी बोलून दाखवली आहे.
बीड विधानसभा मतदार संघात संदीप क्षीरसागर विरुद्ध योगेश क्षीरसागर अशी थेट लढत होती. मात्र आता मनोज जरांगेंच्या समर्थकांनी अपक्ष उमेदवार अनिल जगताप यांना पाठिंबा दिल्याने बीडचं समीकरण बदललं आहे. बीडमध्ये दुरंगी वाटणारी लढत आता तिंरंगी झाली आहे. त्यामुळे मनोज जरांगे यांनी अनिल जगताप यांना दिलेल्या पाठिंब्यामुळे क्षीरसागर बंधुंची अडचण वाढणार आहे.
