काश्मीरमधील कलम ३७० चा मुद्दा आणि देशात दोन संविधान याला काँग्रेसच जबाबदार असल्याचं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चिमूर इथल्या सभेत जोरदार हल्लाबोल केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, जम्मू आणि काश्मीर दशकांपर्यंत फुटीरतावाद आणि दहशतवादाच्या आगीत धुमसत होता. कित्येक जवान शहीद झाले. ही अवस्था कशामुळे झाली? ज्या कायद्याच्या आडून हे सगळं झालं ते कलम ३७० आम्ही हटवलं. ते कलम काँग्रेसने आणलं होतं. ते संपवताच काश्मीरला भारत आणि भारताच्या संविधानाशी जोडलं.तोपर्यंत देशात दोन संविधान होते.
advertisement
जम्मू काश्मीरमध्ये गेल्या ७ दशकांपासून बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान लागू नव्हतं. तुम्ही मला जनादेश दिलात आणि आम्ही कलम ३७० कायमचं हटवलं. पण काँग्रेस आणि आघाडीला हे पचलं नाही. काश्मीरमध्ये सत्ता येताच त्यांनी कलम ३७० पुन्हा आणण्यासाठी हालचाली सुरू केल्या असल्याचंही नरेंद्र मोदींनी म्हटलं.
राज्याचा वेगाने विकास करणं ही आघाडीवाल्यांच्या हातची गोष्ट नाही. त्यांनी विकासाला ब्रेक लावण्यात पीएचडी केलीय. कामं अडकवणं आणि ती दुसरीकडे नेण्यात त्यांची डबल पीएचडी आहे. अडीच वर्षात मेट्रो, वाढवण पोर्ट, समृद्धीी महामार्ग रोखण्याचा प्रयत्न केला. आघाडी म्हणजे भ्रष्टाचाराचे सर्वात मोठे खिलाडी.त्यांना पुन्हा लुट करायला देणार का? महाराष्ट्राच्या प्रगतीला ब्रेक लावू देणार का? असा प्रश्न विचारत पंतप्रधान मोदींनी म्हटलं की, काँग्रेस आणि त्यांचे सहकारी पक्ष हिंसा आणि फुटीरतावादावर राजकीय भाकऱ्या भाजतात.
