उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्त्वातील राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या उमेदवारांची चौथी यादी जाहीर करण्यात आली आहे. चौथ्या यादीत 2 उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. भोर आणि मोर्शी मतदारसंघातील उमेदवार जाहीर करण्यात आले.
ठाकरे गटाच्या नेत्याला संधी...
भोर मतदारसंघातून शंकर मांडेकर यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली. सन 2005 च्या विधानसभेपर्यंत या मतदार संघात भोर व राजगड (वेल्हे) तालुक्याचा समावेश होता. मात्र 2009 मधील पुनर्रचनेनंतर मुळशी तालुक्याच्या समावेशाने 'भोर-राजगड (वेल्हा) मुळशी' असा नवा मतदार संघ झाला. शंकर मांडेकर हे मुळशी तालुक्यातील आहेत. मांडेकर हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख होते. मात्र पक्षांतर्गत कारवाईमुळे त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. त्यानंतर दोन दिवसांपूर्वी त्यांनी अजित पवारांची भेट घेतली राष्ट्रवादी कडून आज त्यांना अधिकृतपणे उमेदवारी जाहीर झाली.
advertisement
मुळशी तालुक्यातील सर्व समावेशक चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. मागील पाच वर्षात भोर वेल्हा तालुक्यात जनसंपर्क वाढविला विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून घरापर्यंत पोहोचले आहेत. त्याचा फायदा निवडणुकीत किती होईल, हे निकालात दिसून येईल.
देवेंद्र भुयारांना संधी
अपक्ष आमदार देवेंद्र भुयार यांना राष्ट्रवादी अजित पवार गटाने अमरावतीमधून मोर्शीतून उमेदवारी जाहीर केली आहे. देवेंद्र भुयार हे अजित पवारांचे निकटवर्तीय समजले जातात. सुरुवातीला महाविकास आघाडीसोबत असणारे भुयार यांनी राष्ट्रवादीतील बंडानंतर अजित पवारांना साथ दिली होती.
