राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी विधानसभा निवडणुकीसाठी तिसऱ्या यादीतील चार उमेदवारांची घोषणा केली आहे. अजितदादांना त्यांच्या बंडात साथ देणारे पण लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांच्याकडे पुन्हा जाणारे अहमदनगरचे खासदार निलेश लंके यांच्या पत्नीविरोधातील उमेदवार जाहीर करण्यात आला आहे. पारनेरमधून अजित पवार गटाने काशिनाथ दाते यांना उमेदवारी दिली आहे. या मतदारसंघातून निलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके या राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या उमेदवार आहेत.
advertisement
नाशिकच्या निफाड पिंपळगाव मतदारसंघात विद्यमान आमदार दिलीप काका बनकर यांनाच उमेदवारी देण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून दिलीप बनकर यांच्यावरच दुसऱ्यांदा विश्वास ठेवण्यात आला आहे. भाजपाचे यतीन कदम यांनी देखील या जागेवर दावा करत अजित पवार यांची भेट घेतली होती. गेल्या काही दिवसांपासून या मतदारसंघात महायुतीकडून कोण उमेदवार असेल याबाबत चर्चा सुरू होत्या.
या तिसऱ्या यादीत नवाब मलिक यांच्या नावाची घोषणा होईल असा अंदाज होता. मात्र, त्यांच्या उमेदवारीवर सस्पेन्स कायम आहे. नवाब मलिक हे अणुशक्तीनगरचे विद्यमान आमदार आहेत. त्यांच्या ऐवजी त्यांची कन्या सना मलिक यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
>> राष्ट्रवादीचे तिसऱ्या यादीतले उमेदवार
- गेवराई - विजयसिंह पंडित
- निफाड - दिलीप बनकर
- फलटण - सचिन पाटील
- पारनेर- काशिनाथ दाते
नवाब मलिक वेटिंग लिस्टवर का?
मलिक हे अणुशक्तीनगरमधील विद्यमान आमदार आहेत. मलिक यांच्याऐवजी त्यांची कन्या सना मलिक ही निवडणुकीच्या मैदानात असणार आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार नवाब मलिक यांचा पत्ता कट झाला आहे. नवाब मलिक यांना उमेदवारी न देण्यावरून भाजपने ठाम भूमिका घेतली होती. मलिक हे मविआ सरकारच्या काळात मंत्री असताना विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेले आरोप आणि दिलेल्या पुराव्यांमुळे नवाब मलिक हे तुरूगांत होते. त्याआधी नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदा घेत तत्कालीन एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर आरोपांचा धुरळा उडवला होता.
सध्या प्रकृतीच्या कारणास्तव मलिक यांना सुप्रीम कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. मलिक यांना पु्न्हा उमेदवारी दिल्यास विरोधकांना आयते कोलीत मिळेल. शिवाय त्यांच्या उमेदवारीवर आक्षेप घेतील असे अंदाज महायुतीच्या नेत्यांनी बांधला. पण अजित पवार मात्र नवाब मलिक यांच्या उमेदवारीसाठी आग्रही होते.
