वरुण सरदेसाईंच्या अडचणीत वाढ
यंदाची निवडणूक ठाकरे गटासाठी अतिशय महत्त्वाची आहे. शिवसेनेच्या फुटीनंतर ठाकरेंकडून आपली राजकीय ताकद सिद्ध करण्यासाठी पूर्ण प्रयत्न सुरू आहेत. आदित्य ठाकरे हे वरळीतून निवडणुकीच्या मैदानात आहे. तर, दुसरीकडे आदित्यचा मावसभाऊ आणि युवा सेना सचिव वरुण सरदेसाई हे वांद्रे पूर्व येथून निवडणूक लढवत आहेत. या मतदारसंघात मातोश्री आहे. मागील विधानसभेत ज्या उमेदवारामुळे ठाकरेंच्या उमेदवाराचा पराभव झाला होता, तोच उमेदवार आता मनसेकडून निवडणूक लढवणार आहे.
advertisement
वांद्रे पूर्व मतदार संघातून माजी शिवसेना आमदार तृप्ती सावंत मनसेकडून निवडणूक लढवणार आहे. तृप्ती सावंत यांनी मनसेमध्ये प्रवेश केला. आज सकाळीच तृप्ती सावंत यांनी राज ठाकरेंचे निवासस्थान शिवतीर्थ गाठले. मनसेमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांना मनसेकडून एबी फॉर्म देण्यात आला आहे. वांद्रे पूर्व मतदारसंघातून उद्धव ठाकरेंचा भाचा वरुण सरदेसाईंविरोधात उमेदवारी मिळाली आहे. तृप्ती सावंत या निवडणुकीच्या रिंगणात आल्याने मतदानाची गणिते बदलली जाणार आहेत.
> तृप्ती सावंत यांच्या उमेदवारीने काय परिणाम होणार?
तृप्ती सावंत या शिवसेना आमदार बाळा सावंत यांच्या पत्नी आहेत. बाळा सावंत यांच्या निधनाने झालेल्या पोटनिवडणुकीत शिवसेनेकडून तृप्ती सावंत यांना संधी देण्यात आली होती. तर, काँग्रेसकडून नारायण राणे यांना उमेदवारी देण्यात आली होती. या निवडणुकीत राणे यांचा पराभव झाला. त्यानंतर मागील विधानसभा निवडणुकीत तृप्ती सावंत यांच्याऐवजी माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना संधी देण्यात आली. तर, तृप्ती यांनी बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढवली. त्यांना 24,071 मते मिळाली. तर, मनसेच्या अखिल चित्रे यांनी 10 हजार मते घेतली. झिशान सिद्दिकी यांचा 5 हजारांच्या मतांनी विजय झाला होता. त्यामुळे तृप्ती सावंत यांना मनसेने उमेदवारी दिल्यास मतदारसंघात मोठी उलथापालथ होऊ शकते.
> वांद्रे पूर्व 2019 मतदारसंघाचा निकाल काय?
झिशान सिद्दिकी, काँग्रेस - 38,337
विश्वनाथ महाडेश्वर, शिवसेना - 32,547
तृप्ती सावंत, अपक्ष बंडखोर शिवसेना - 24,071
मोहम्मद कुरेशी, एमआयएम - 12,594
अखिल चित्रे, मनसे- 10,683
