महायुतीने पुन्हा सत्तेत येण्यासाठी कंबर कसली आहे. लोकसभा निवडणुकीत पराभवाचा धक्का बसल्यानंतर महायुती सरकारने लोकप्रिय निर्णयांचा धडाका लावला. आता जागा वाटपातही उमेदवारांची अदलाबदल करून संबंधित जागा जिंकण्यासाठीची रणनीति आखली जात आहे. आता, राज्यात महायुतीच्या प्रचाराचा धडाका लावण्यात येणार आहे. भाजपकडून राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. आपल्या परदेश दौऱ्याआधी पंतप्रधान महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार करणार आहेत.
advertisement
महायुतीसाठी पीएम मोदींच्या सभा धडाका
महायुतीच्या उमेदवारांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यात प्रचार सभांना संबोधित करणार आहेत. महायुतीसाठी पीएम मोदी हेच मोठे स्टार प्रचारक आहेत. पंतप्रधान मोदी हे 5 नोव्हेंबर ते 14 नोव्हेंबर दरम्यान महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली. या दरम्यानच्या कालावधीत पंतप्रधानांच्या सभांचा धडाका सुरू असणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी घेणार विभागवार सभा
फक्त भाजपच नाही तर महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदींची सभा होणार आहे.त्यामुळे महायुती ही एकसंध असल्याचा संदेश लोकांमध्ये जाणार आहे. राज्यातील 8 सभांना पीएम मोदी संबोधित करणार असल्याची माहिती आहे.
शेवटच्या प्रचार सभेला नसणार?
पंतप्रधान मोदी हे 5 नोव्हेंबर ते 14 नोव्हेंबर दरम्यान महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असणार आहेत. पंतप्रधान 14 नोव्हेंबरनंतर परदेश दौऱ्यावर असल्याने सभांना मिळणार कमी कालावधी आहे. राज्यात 20 नोव्हेंबर रोजी मतदान आहे. प्रचाराच्या तोफा 18 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता थंडावणार आहेत. त्याआधीच्या एक-दोन दिवस आधीच महायुतीची शेवटची प्रचार सभा होण्याची शक्यता आहे. पंतप्रधान मोदी हे 14 नोव्हेंबर नंतर परदेश दौऱ्यावर जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे 14 नोव्हेंबर रोजी अथवा त्याआधी पंतप्रधानांची सभा होण्याची दाट शक्यता आहे.
