पालघर आमदार श्रीनिवास वनगा यांनी एकनाथ शिंदे यांना बंडखोरीत साथ दिली होती. त्यानंतर आता त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली आहे. श्रीनिवास वनगा यांनी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फसवणूक केली असल्याचा आरोप केला आहे. मागील 12 तासांहून अधिक वेळ श्रीनिवास वनगा नॉट रिचेबल असून कुटुंबियांसह पोलीसही त्यांचा शोध घेत आहेत. तर, दुसऱ्या बाजूला एकनाथ शिंदे यांना बंडखोरीत साथ देणाऱ्या आमदाराला उमेदवारी नाकारण्यात आली आहे.
advertisement
गीता जैन यांना उमेदवारी नाकारली...
अपक्ष आमदार गीता जैन यांना भाजपने उमेदवारी नाकारली आहे. मीरा-भाईंदर मतदारसंघातून सोमवारी गीता जैन यांनी अपक्ष म्हणून अर्ज भरला होता. पण, या मतदारसंघातून भाजपने नरेंद्र मेहता यांना संधी दिली आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर गीता जैन यांनी शिवसेनेला पाठिंबा दिला होता. मात्र, एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर त्यांनी तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि गुवाहाटीला एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला. आता, त्याच गीता जैन यांना भाजपने उमेदवारी नाकारली आहे. तर, दुसरीकडे अपक्ष आमदार शंकरराव गडाख यांना ठाकरे गटाने उमेदवारी दिली आहे. गडाख यांनी देखील शिवसेनेला पाठिंबा दिला होता. शिवसेनेतील फुटीनंतर त्यांनी उद्धव यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला होता.
कोण आहेत गीता जैन?
गीता जैन या मूळच्या भाजपच्या आहेत. मीरा-भाईंदर महापालिकेत नगरसेवक, महापौर अशी जबाबदारी त्यांनी पार पाडली. गीता जैन या मीरा-भाईंदरमध्ये भाजपच्या आघाडीच्या महिला नेत्या अशी त्यांची ओळख होती. त्यानंतर 2019 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी पक्षाकडे विधानसभेसाठी उमेदवारी मागितली. तत्कालीन आमदार नरेंद्र मेहता यांच्याविरोधात असलेले जनमत आणि विविध आरोपांवरून गीता जैन यांनी मेहता यांना विरोध केला होता. मात्र, त्यानंतरही भाजपने त्यांना उमेदवारी नाकारली. अखेर गीता जैन यांनी बंडखोरी केली आणि निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. गीता जैन यांनी विधानसभेच्या निवडणुकीत नरेंद्र मेहता यांचा पराभव केला. अपक्ष आमदार म्हणून निवडणूक जिंकल्यानंतर निर्माण झालेल्या सत्ता पेचात सुरुवातीला जैन यांचा कल भाजपच्या बाजूने होता. मात्र, मविआचे सरकार स्थापन झाल्यावर त्यांनी शिवसेनेला पाठिंबा दिला. एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर त्यांच्यासाठी एक-एक आमदार महत्त्वाचा होता. अशा वेळी गीता जैन यांनी ठाकरेंची साथ सोडत शिंदेंना साथ दिली.
भाजपने उमेदवारी नाकारली....
भाजपने आपल्या उमेदवारांची चौथी यादी जाहीर केली. या यादीत भाजपने विद्यमान आमदार गीता जैन यांना धक्का दिला आहे. मीरा-भाईंदरमधून गीता जैन यांच्याऐवजी माजी आमदार नरेंद्र मेहता यांना उमेदवारी देण्यात आली आहे. आता, गीता जैन अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार की माघार घेणार हे अद्याप स्पष्ट झाले नाही.
