उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती ग्रामीण भागामध्ये गाव भेट दौरा करत आहेत. सकाळी सात वाजल्यापासून त्यांनी आपल्या गाव भेट दौऱ्याला सुरुवात केली आहे. बारामती मधील वंजारवाडी या गावी सकाळी सात वाजता गावकऱ्यांशी त्यांनी संवाद साधला व त्यांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या. त्यानंतर त्यांनी रुई गावात सभा घेतली. या सभेत अजित पवारांनी आपण भाजपसोबत का जाण्याचा निर्णय घेतला याचे स्पष्टीकरण दिले. एका बाजूला निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना दुसरीकडे आता आज भाऊबीज निमित्त सुप्रिया सुळेंकडून अजित पवार ओवाळणी करणार का, याकडे लोकांचे लक्ष लागले आहे.
advertisement
सुप्रियाला ओवाळणी देणार, अजितदादांनी म्हटले...
परंपरेनुसार पवार कुटुंबाची पारंपरिक भाऊबीज गोविंदबागेतच पार पडणार आहे. पण, या कौटुंबिक कार्यक्रमाकडे अजितदादा पाठ फिरवणार असल्याचे म्हटले जात आहे. अजित पवार यांना त्यांच्या गाव भेट दौऱ्यात याबाबत त्यांनी म्हटले की, आज सकाळीच माझ्या जेवढ्या बहिणी मला ओवाळायला घरी आल्या होत्या...त्यांच्याकडून मी ओवाळून घेतलंय...त्यानंतरच मी घराबाहेर पडलो असल्याचे अजित पवारांनी म्हटले. मला आज 25 -30 गावांचे दौरे करायचेत ...मला आता या विषयावर बोलायला अजिबात वेळ नसल्याचे अजित पवारांनी स्पष्ट केले.
प्रचारासाठी मोजकेच दिवस…
सध्या दिवाळीची धामधूम असल्याने प्रचार थंडावला आहे. दिवाळी 3 नोव्हेंबरला संपत आहे, तर 4 नोव्हेंबर ही अर्ज माघारीची मुदत आहे. त्यानंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे. 20 नोव्हेंबरला मतदान होणार आहे, तर प्रचार 18 नोव्हेंबरला संपणार आहे. या कालावधीत केवळ 10 नोव्हेंबर आणि 17 नोव्हेंबरला रविवार आला आहे.
