काँग्रेसने बुधवारी नागपुरातील सुरेश भट सभागृहात संविधान सन्मान परिषदेचे आयोजन केले होते. या परिषदेला विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे नेते राहुल गांधीही सहभागी झाले होते. या परिषदेदरम्यान उपस्थितांना 'भारताचे संविधान', असं लिहिलेले एक नोटपॅड देण्यात आले होते. त्याशिवाय एक बुकमार्क ही देण्यात आले. यावरून भाजपने काँग्रेसवर निशाणा साधला आहे.
भाजपने ट्वीट केला व्हिडीओ...
advertisement
भाजपने या परिषदेतील 'लाल किताब'चा व्हिडीओ जारी केला आहे. या ट्वीटमध्ये काँग्रेसवर निशाणा साधताना भाजपने म्हटले की, संविधान सिर्फ बहाना है लाल पुस्तक को बढ़ाना है, मोहब्बत के नाम पर सिर्फ नफरत फैलाना है...
काँग्रेसला भारताचे संविधान असेच कोरे करायचे आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेले सर्व कायदे अनुच्छेद वगळून टाकायचे आहेत. म्हणूनच तर राहुल गांधींनी मध्यंतरी आरक्षण रद्द करणार ही भविष्यवाणी केली होती असे भाजपने आपल्या ट्वीटर हँडलवर म्हटले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचं संविधान हा निवडणुकीचा मुद्दा नाही तर भारताचा आणि भारतीयांच्या जगण्याचा पाया आहे. त्यामुळे संविधान विरोधी कॉग्रेसला जनताच धडा शिकवेल, असेही भाजपने म्हटले.
काँग्रेसने काय म्हटले?
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी भाजपवर पलटवार करताना म्हटले की, संविधान सन्मान परिषदेला उपस्थित मान्यवरांना नोटपॅड आणि पेन देण्यात आले. त्याचा व्हिडिओ बनवून असे बेताल आरोप करण्यात काही अर्थ नाही. राहुल गांधी नागपुरात आले तेव्हा भाजपवाले इतके घाबरले का? संविधान आणि राहुल गांधी तुमचे खोटे वेळोवेळी उघड करतील. ही तर सुरुवात आहे, असेही वडेट्टीवार यांनी म्हटले.
