भाजप नेते गिरीश महाजन यांनी सांगितले की, सध्या अतिशय चांगलं चित्र महायुतीसाठी महाराष्ट्रात दिसतंय. मतदारांनी ठरवलं आहे की राज्यात पुन्हा महायुतीचं स्पष्ट बहुमताच सरकार येईल, आमचे मुख्यमंत्री होतील. मुख्यमंत्रीपदाबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, आमच्यामध्ये कुठेही रस्सीखेच नाही. महायुतीमध्ये आमच्याकडे कुठेही मुख्यमंत्री कोणाला व्हायचंय अशी कुठेही ओढाताण नाही. निकाल लागल्यानंतर सर्वजण एकत्र बैठक करू. त्यानंतर वरिष्ठ नेते निर्णय घेतील आणि दिल्लीला वरिष्ठ त्यावर शिक्कामोर्तब करतील असे सांगताना मुख्यमंत्रीपद हा वादाचा विषय नसल्याचे महाजन यांनी स्पष्ट केले.
advertisement
महायुतीला किती जागा?
गिरीश महाजन यांनी माध्यमांशी बोलताना महायुतीच्या विजयाचा विश्वास व्यक्त केला. महायुतीला या विधानसभा निवडणुकीत 160 ते 165 जागा मिळतील. आम्हाला स्पष्ट बहुमतही मिळेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. शरद पवारांनी केलेल्या नाद करू नका वक्तव्यावर बोलताना महाजन म्हणाले की शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांच्याबद्दल काय बोलणार. 23 नोव्हेंबर रोजी निकाल लागेल. त्यावेळेस कळेल कोणी कुणाचा नाद करू नये, असा टोलाही महाजन यांनी लगावला.
संजय राऊत हे गटारातले बेडूक...
गिरीश महाजन यांनी शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्यावर बोचरी टीका केली आहे. महाजन यांनी सांगितले की, आमच्यासोबत इतके वर्ष होते. त्यावेळेस त्यांना कळालं नाही कोण शत्रू आहे कोण दुश्मन आहे. संजय राऊत यांना कोणी गांभीर्याने घेत नाही वाटेल ती बडबड ते करत असतात असा टोलाही त्यांनी लगावला. संजय राऊत काहीही म्हणाले तरी त्याचा मतदानावर परिणाम होणार नाही. पण त्यांनी आपली पात्रता पाहूनच बोललं पाहिजे असं मला वाटतं. आमचा पक्ष देशभर आहे ते आपले गटारातले बेडूक आहेत, डबक्यातले बेडूक आहेत. त्यामुळे आम्ही जिंकलो तर तिकडे दुसऱ्या राज्यात आनंद होणे स्वाभाविक असल्याचे त्यांनी म्हटले.
