महाडिकांचे बंड शमले!
बंडोबांना थंड करण्यासंदर्भात महायुतीची महत्वाची बैठक 'वर्षा' निवासस्थानी रात्री उशिरा पार पडली. बंडोबांना थंड करण्यासाठी बैठकीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे, खासदार धनंजय महाडिक उपस्थित होते. या बैठकीत बंडोबांना थंड करण्यात एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस,अजित पवारांना यश मिळाले आहे. विधानसभा निवडणुकीत शिरोळा मतदारसंघातून बंडखोरी करणारे सम्राट महाडिक यांनी आपली बंडाची तलवार म्यान केली आहे.
advertisement
भाजप आमदार प्रविण दरेकर गेल्या काही दिवसांपासून सम्राट महाडिक यांच्या संपर्कात होते. शिराळाचे भाजपाचे बंडखोर उमेदवार सम्राट महाडिक यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांची भेट घेतली. यावेळी महायुतीच्या नेत्यांनी सम्राट महाडिक यांच्यासोबत उमेदवारी माघारीबाबत चर्चा केली. या चर्चेनंतर सम्राट महाडिक यांनी निवडणुकीत माघार घेणार असल्याचे सांगितले. महाडिक यांनी माघार घेतल्याने सत्यजित देशमुख यांचा शिराळामधून विजयातील एक आव्हान कमी झाले असल्याचे म्हटले जात आहे. मागील निवडणूकीत सम्राट महाडिक यांनी 55 हजार मते घेतली होती.
बंडखोरांनी टेन्शन वाढवले...
राज्यात महायुती आणि महाविकास आघाडी या दोघांचेही जवळपास 150 बंडखोर निवडणुकीच्या रिंगणात आहेत. विधानसभा निवडणुकीच्या लढतीचे अंतिम चित्र हे 4 नोव्हेंबर रोजी स्पष्ट होईल.
राज्यातील प्रमुख दोन आघाडींसाठी ही बंडखोरी डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे. महायुतीमध्ये जवळपास 80 ठिकाणी बंडखोर उभे करण्यात आल्याचे चित्र आहे. निवडणुकीचा उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठीची शेवटची तारीख ही 4 नोव्हेंबर आहे. या दरम्यानच्या कालावधीत बंडोंबांना थंड करण्याचे जोरदार प्रयत्न होणार आहेत.
