मविआत दोस्तीत कुस्ती?
बारामतीमधील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार युगेंद्र पवार यांचा अर्ज भरण्यासाठी शरद पवार आले होते. युगेंद्र पवार यांचा अर्ज भरल्यानंतर शरद पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. महाविकास आघाडीतील घटक पक्षांकडून एकाच मतदारसंघात परस्पर उमेदवार जाहीर करण्यात आले आहे. या उमेदवारांना संबंधित घटक पक्षांनी एबी फॉर्मदेखील दिले आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीत दोस्तीत कुस्ती होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
advertisement
शरद पवारांनी काय सांगितले?
राष्ट्रवादी काँग्रेस पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले की, महाविकास आघाडीत सुरळीत चर्चा सुरू आहे. काही ठिकाणी आमच्या दोन घटक पक्षांचे अर्ज भरण्यात आले आहेत. अशा मतदारसंघात ते दोन्ही फॉर्म कायम ठेवण्यास सांगण्यात आले आहे. अर्ज मागे घेण्यासाठी आणखी काही दिवसांचा अवधी आहे. त्या दरम्यान चर्चेतून मार्ग काढू असे शरद पवार यांनी सांगितले. महाविकास आघाडीत 90 टक्के जागांवर एकमत झाले असल्याची माहितीदेखील त्यांनी दिली.
लोकांचा महाविकास आघडीला पाठिंबा...
शरद पवार यांनी सांगितले की, मी जवळपास सगळ्याच जिल्ह्यांचा आढावा घेत आहे. लोकसभेत जनतेने पाठिंबा दिला. लोकसभेप्रमाणे विधानसभेतही जनता पाठिंबा देईल, अशी खात्री असल्याचे त्यांनी सांगितले. आज ज्यांच्या हाती सत्ता आहे, त्यांच्याकडून लोकांचे प्रश्न सोडवले गेले नाहीत. मविआ सरकार हे जनतेच्या प्रश्न सोडवणारे सरकार असेल, आमची आघाडी यासाठी काम करेल असा विश्वास मी याठिकाणी देत असल्याचे शरद पवार यांनी सांगितले.
