पैठण मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाने खासदार संदीपान भुमरे यांचे चिरंजीव विलास भुमरे यांना उमेदवारी दिली आहे. विलास भुमरे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यावेळी त्यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रतातून संपत्ती आणि मालमत्तेची माहिती समोर आली आहे. विलास भुमरे यांनी त्यांच्या शपथपत्रात त्यांच्या पत्नी नावे मद्यविक्रीचे चार परवाने असल्याची माहिती दिली आहे.
advertisement
खासदार भुमरे विरोधकांच्या रडारवर का येणार?
या पूर्वी लोकसभा निवडणुकीमध्ये खासदार संदीपान भुमरे यांनी त्यांच्या नावावर दोन मद्य परवाने असल्याची माहिती दिली होती. खासदार संदीपान भुमरे व त्यांच्या स्नुषा या दोघांच्या नावावर एकूण 6 मद्य परवाने असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. पुणे येथेही मद्यविक्रीचा परवाना भुमरे कुटूंबियांकडे असल्याचे शपथपत्रात नमूद करण्यात आले आहे.
लोकसभा निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाने संदीपान भुमरे यांच्यावर जोरदार टीका केली होती. त्यावेळी ठाकरे गटाकडून दारू विक्रेता अशी हेटाळणी करणारा प्रचार केला होता. त्याच वेळी भुमरे कुटुंबीयांच्या नावे 9 मद्यविक्री परवाने असल्याचा आरोप करण्यात आला होता. मात्र, भुमरे यांनी विरोधकांच्या आरोपांवर फारसे स्पष्ट वक्तव्य करणे टाळले. लोकसभा निवडणुकीत मद्य विक्रीवरून टीका होत असतानाही भुमरे हे लोकसभा निवडणुकीत छत्रपती संभाजीनगरमधून विजयी झाले.
