शिवडी मतदारसंघातील लालबाग-परळ हा गिरणगावचा एक भाग समजला जातो. बहुसंख्य मराठी भाषिक, गिरणी कामगारांचा हा परिसर आहे. मराठी सण, उत्सवांची मोठी परंपरा या भागात सुरू आहे. कापड गिरण्या असलेल्या या भागात कम्युनिस्टांचे वर्चस्व होते. मात्र, 1970 मध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे आमदार कृष्णा देसाई यांची हत्या झाल्यानंतर पोटनिवडणूक झाली. या पोटनिवडणुकीत शिवसेनेचे वामनराव महाडिक विजयी झाले. त्यानंतर या परिसरावरून डावे पक्ष कमकुवत झाले आणि कालओघात हा परिसर शिवसेनेचा बालेकिल्ला झाला. तेव्हापासून आतापर्यंत या भागात शिवसेनेचा उमेदवार कायम निवडणुकीच्या रिंगणात राहिला आहे.
advertisement
गिरण्या बंद झाल्यानंतर या ठिकाणी मॉल, मोठे निवासी प्रकल्प उभारले गेले. चाळींचा पुनर्विकासही मोठ्या प्रमाणावर झाला. त्यानंतर हा भाग संमिश्र वस्तीचा परिसर झाला असला तरी मराठी माणसांचा परिसर म्हणून हा भाग पाहिला जातो. शिवडी विधानसभा मतदारसंघात शिवडी, लालबाग-परळ हा परिसर येतो. आता या भागात पहिल्यांदाच निवडणूक धनुष्य बाणाशिवाय होणार आहे.
शिवसेनेच्या उमेदवाराशिवाय निवडणूक...
एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वात शिवसेनेत मोठी फूट पडली. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी पक्षावरच दावा केला. केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना हा पक्ष आणि निवडणूक चिन्ह हे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वातील गटाला दिले. तर, ठाकरे गटाला वेगळा पक्ष आणि निवडणूक चिन्हाची ओळख मिळाली. एका अर्थाने एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना ही निवडणूक आयोगाच्या दृष्टीने हा खरा पक्ष आहे.
ठाकरेंचा उमेदवार पण शिंदेचा नाही...
शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जाणाऱ्या भागात यंदाच्या निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाचे विद्यमान आमदार अजय चौधरी हे उमेदवार असणार आहेत. तर, त्यांच्यासमोर मनसेचे बाळा नांदगावकर हे उमेदवार आहेत. महायुतीमधील शिवसेना आणि भाजपकडून या मतदारसंघात उमेदवार देण्यात आला नाही. शिवसेना शिंदे गटाकडून उमेदवार दिला जाणार असल्याची चर्चा होती. भाजपच्या काही नेत्यांनी या मतदारसंघावर दावा केला होता. परंतु, उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या तारखेपर्यंत शिवसेना-भाजपकडून उमेदवार जाहीर करण्यात आला नाही.
मतदारसंघातून धनुष्य-बाण गायब....
शिवसेना ठाकरे गटाचे अजय चौधरी हे मशाल या निवडणूक चिन्हावर निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वातील शिवसेनेने उमेदवार न दिल्याने आता शिवडी मतदारसंघातून धनुष्य-बाण गायब झाला आहे.
शिवडी विधानसभा निवडणुकीत मशाल विरुद्ध इंजिन अशी लढत होणार आहे. मनसे उमेदवार बाळा नांदगावकर यांना महायुती पाठिंबा जाहीर करणार. आता, शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात मनसेचे इंजिन धावेल की ठाकरेंच्या मशाल धगधगती राहणार, हे निवडणूक निकालाच्या दिवशी स्पष्ट होईल.
