शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी म्हटले की, अधिवेशन उद्यापासून सुरू होत आहे. त्यापूर्वी सरकारकडून आम्हाला चहापानाचे आमंत्रण दिले आहे. पण राज्यातील परिस्थिती पाहता, शेतकऱ्यांचे हाल बी-बियाणे, पंप वीज असे प्रश्न आहे. या सरकारच्या पक्षात तीन तोंड तिघांकडे आहे. यांचेच एक माजी मंत्री म्हणतात की शेतकऱ्यांच्या पायातील बूट हे मोदींनी दिले आहे. सगळ्यात महत्वाचे म्हणजे मराठीवर होणारा अन्याय हिंदीची केली जाणारी सक्ती आम्हाला मान्य नसल्याचे दानवे यांनी सांगितले.
advertisement
देशाच्या सरन्यायाधीशांचा अपमान या सरकारने केला. तर, शक्तिपीठ महामार्ग हा बळजबरीने केला जात आहे. सत्ताधाऱ्यांशी संबंध असलेले गुन्ह्याच्या प्रकरणात अडकले आहेत. वैष्णवी हगवणे प्रकरण ते ठाण्यातील एका हत्या प्रकरणात राष्ट्रवादीचा नेत्याचा हात असल्याचा आरोप दानवे यांनी केला. या आधी प्रचारात भाजप म्हणत होते की कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र, आता त्यांनाच 'कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा' हे विचारण्याची वेळ आली असल्याचे दानवे यांनी सांगितले.
शिवसेना ठाकरे गटाचे नेते, आमदार आदित्य ठाकरे यांनी म्हटले की, जे महाराष्ट्रद्वेष्टे आहेत त्यांच्या चहापाण्याला जाणे हे खूपच चुकीचे आहे. हे महायुतीचे सरकार नसून महाझुटी सरकार असल्याचा हल्लाबोल ठाकरे यांनी केला. ज्यांच्यावर भाजपने भ्रष्टाचाराचे आरोप केले, तेच लोक आज सत्ताधारी बाकावरील सदस्य म्हणून चहापाण्याला येणार असल्याचे ठाकरे यांनी सांगितले. मुख्यमंत्री आज त्यांना बघतील आणि मनात म्हणतील हाच तो माणूस ज्यांच्यावर मी आरोप केले होते. टीका झाल्यानंतर 11 वी प्रवेश यादी जाहीर करण्यात आली आहे. दादा भुसे यांच्यावर पालकांकडून भ्रष्टाचाराचे आरोप होऊ लागले आहेत. समृद्धी महामार्गाच्या कामातही भ्रष्टाचार झाल्याचा आरोप ठाकरे यांनी केला. भूमरे यांच्या ड्रायव्हरने फुकटात संपत्ती बनविली आहे. मुख्यमंत्री यांना हे दिसत नाही का, असा सवाल ठाकरे यांनी केला.
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार म्हणाले की, बळीराजाच्या जीवावर जगत असताना हे सरकार शेतकरी यांना म्हणते की तुमच्या पायातल्या चप्पल आम्ही दिल्या, तुमच्या अंगावरचे कपडे आम्ही दिले, अशा सरकारच्या चहापानावर आम्ही बहिष्कार टाकत आहोत.
या सरकारमधील मंडळी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहोत. एकमेकांकडे आलेल्या गोष्टीतून पैसे टक्केवारी काढण्याचे काम हे सरकार करत आहे. अशा सरकारच्या चहापानावर का जायचे असा सवाल त्यांनी केला.