मुंबई : मुंबई महापालिकेत भाजप आणि शिवसेना एकत्र लढली, मुंबईत सत्ता स्थापन करता येईल इतकं संख्याबळ युतीला मिळालं. मात्र असं असलं तरी सत्ता स्थापन करण्यास वेळ का लागतोय अशी चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान मुंबई महापालिकेतील सत्तावाटपाचे अडललेले घोडे दामटणयासाठी आता खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरसावले आहेत. फडणवीस-शिंदे यांच्यात मध्यरात्री बैठक होणार असून अवघ्या राज्याचं या बैठकीकडे लक्ष लागले आहे.
advertisement
मुंबईतील महापौरपदाचा तिढा अद्यापही सुटलेला नाही
मुंबई महापालिकेच्या निकालाला दहा दिवस उलटून गेल्यानंतर मुंबईतील महापौरपदाचा तिढा अद्यापही सुटलेला नाही. भाजप हा सर्वाधिक 89 जागा मिळवत पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला असला तरी एकट्याच्या बळावर भाजप सत्ता स्थापन करू शकत नाही. भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेच्या 29 नगरसेवक मिळून बहुमताचा आकडा सहज गाठू शकतात. मात्र अजूनही याबाबत दोन्ही बाजूंकडून हालचाल झालेली नाही. निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून शिंदेंच्या शिवसेनेनं आपल्या नगरसेवकांना हॉटेलमध्ये ठेवलं होतं. मात्र हा दबावतंत्राचा भाग असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्यानंतर शिवसेनेच्या नगरसेवकांनी हॉटेलमधून चेक आऊट केलं.
खुद्द फडणवीसांनी घेतला पुढाकार
महापालिकेतील सत्ता समिकरणासाठी अमित साटम आणि राहुल शेवाळे यांच्यात नवी दिल्लीत झालेली चर्चा वगळता दोन्ही पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये चर्चा झालेली नाही. मुख्यमंत्री दावोस दौऱ्यावरून परतल्यानंतर मुंबईत परतल्यानंतरही मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात सोमवारपर्यंत तरी चर्चा झालेली नाही. त्यानंतर आता खुद्द फडणवीसांनी पुढाकार घेतला असून आज फडणवीस आणि शिंदे यांच्यात मध्यरात्री बैठक होणार आहे.
भाजप-शिवसेनेत अद्यापही रस्सीखेच सुरु
मध्यरात्री होणाऱ्या या बैठकीत मुंबई भाजप कोअर कमिटीतील प्रमुख नेत्यांसोबत चर्चा करून फडणवीस राहुल शेवाळे यांच्यासोबत सविस्तर चर्चा करणार आहे. सत्तावाटप अंतिम करण्यासाठी फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यात मध्यरात्री होणाऱ्या महत्त्वाची बैठकीकडे राज्याचं लक्ष लागलं आहे. त्यामुळे मुंबई पालिकेत सत्ता वाटपावरून भाजप-शिवसेनेत अद्यापही रस्सीखेच सुरु असल्याचं लपून राहिलं नाही.
