राज्यात विधानसभेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर मराठा आरक्षणाच्या मुद्यावर मनोज जरांगे पाटील यांनी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले होते. आरक्षणासाठी मराठा समाजाने मतदानाची ताकद दाखवावी असे आवाहन केले होते. या निवडणुकीत काही ठिकाणी उमेदवार उभे करण्याबाबतही त्यांनी भाष्य केले. मात्र, वारंवार तारीख देऊनही अद्याप जरांगेकडून उमेदवारांबाबत कोणतेही भाष्य करण्यात आले नाही. तर, दुसरीकडे मराठा मतांच्या जोडीला इतर मतेही जोडण्यासाठी जरांगे पाटील यांच्याकडून चाचपणी सुरू झाली आहे.
advertisement
अंतरवालीत आज महत्त्वाची बैठक...
आज मनोज जरांगे यांची अंतरवाली सराटी येथे बौद्ध आणि मुस्लिम समाजाच्या धर्मगुरूंसोबत बैठक होणार आहे. या बैठकीत निवडणुकीसाठी मराठा,मुस्लिम आणि मागासवर्गीय घटक यांचं समिकरण जुळतं की नाही याबाबत चाचपणी केली जाणार आहे.आज सकाळी 11 वाजता या बैठकीला सुरुवात होणार आहे. या बैठकीत दलित, मुस्लिम आणि मराठा समीकरण जुळाल्यानंतरच जरांगे त्यांचे उमेदवार येत्या 2 तारखेला जाहीर करण्याची शक्यता आहे. अन्यथा इतर ठिकाणी कोणत्या उमेदवारांना पाठिंबा द्यायचा की कोणाविरोधात मतदान करायचे याचा निर्णय 2 नोव्हेंबर रोजी होण्याची शक्यता आहे.
