भाजपमधून शिवसेनेत...
महायुतीमध्ये जागा वाटपाचा तिढा पूर्णपणे सुटला नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे काही जागांवरील उमेदवार अद्यापही जाहीर झाले नाहीत. तर, दुसरीकडे महायुतीमधील पक्षांमध्ये उमेदवार अदलाबदली करण्यात येत आहेत. त्यानुसार आता, भाजपचा आणखी एक शिलेदार शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचे म्हटले जात आहे. मुंबई भाजपचे उपाध्यक्ष असलेले नाना आंबोले हे पूर्वी एकसंध शिवसेनेत परळमधील नगरसेवक होते. मात्र, महापालिका निवडणुकीपूर्वी त्यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र भाजपचे कमळ हाती घेतले. महापालिका निवडणुकीत नाना आंबोले यांचा वॉर्ड महिलांसाठी राखीव झाल्याने त्यांच्या पत्नींना उमेदवारी देण्यात आली. मात्र, त्यांचा पराभव झाला.
advertisement
शिवडीतून उमेदवारी...
मराठीबहुल, गिरणगावचा भाग असलेल्या शिवडी मतदारसंघात सध्या महायुतीकडे उमेदवार म्हणून मोठा चेहरा नसल्याची चर्चा होती. शिवसेनेत असताना नाना आंबोले दोन टर्म नगरसेवक होते. परळमध्ये नाना आंबोले यांचा जनसंपर्क आहे. स्थानिक असल्याने शिवडी मतदारसंघातील मुद्दे नाना आंबोले यांना माहित आहेत.
नाना आंबोले यांचा फायदा होणार?
शिवडीतून नाना आंबोले यांना उमेदवारी दिल्यास शिवसेनेचे जुने मतदार नाना आंबोले यांच्याकडे वळण्याची शक्यता आहे. नाना आंबोले यांच्या उमेदवारीमुळे शिवडी मतदारसंघात तिरंगी लढत होणार आहे. शिवसेना ठाकरे गटाचे अजय चौधरी, मनसे बाळा नांदगावकर आणि आता शिवसेना शिंदे गटाचे नाना आंबोले यांच्यात लढत होणार आहे.
