धनंजय महाडिक यांनी म्हटले की, सुरुवातीला राजेश लाटकर यांना उमेदवारी घोषित केली. त्यानंतर, मात्र काँग्रेस कार्यकर्ते व नगरसेवकांनी त्याला विरोध केला. यामुळे उमेदवारी बदलाची नामुष्की सतेज पाटलांवर आली. त्यानंतर काँग्रेसच्या उमेदवारीसाठी त्यांना थेट नवीन राजवाड्यावर जावं लागलं. राजकारणासाठी या व्यक्तीने राजघराण्याचा कशा पद्धतीने वापर केला हे दिसून येत असल्याचे महाडिकांनी म्हटले.
advertisement
मधुरिमा राजे छत्रपती यांची उमेदवारी जाहीर झालेले पत्र दुसऱ्या दिवशी आलं आणि वाजत गाजत त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला. सतेज पाटलांची पहिली पसंती त्यांची राजू लाटकर होती आणि दुसरी पसंती मधुरिमाराजे छत्रपती होती. हा प्राधान्यक्रम म्हणजे हा छत्रपती घराण्याचा अवमान असल्याचे त्यांनी म्हटले.
राजू लाटकर यांना उमेदवारी मागे घेण्यासाठी यशस्वी होऊ शकले नाहीत ही सतेज पाटलांवर ओढावलेली तिसरी नामुष्की असल्याचा वार धनंजय महाडिकांनी केला. शाहू महाराज छत्रपती, मधुरिमा राजे छत्रपती, मालोजीराजे छत्रपती यांनी जाऊन उमेदवारी मागे घेतली हे काँग्रेसच्या संपूर्ण इतिहासात पहिल्यांदाच असं झाला असेल, असेही त्यांनी म्हटले. उमेदवारी मागे घेऊन कार्यालयातून बाहेर येत असताना व्हायरल होणारा व्हिडिओ हा मन हेलावून टाकणारा होता. सहा महिन्यापूर्वी गादीचा मान गादीचा मान म्हणून सगळीकडे मत मागत होते ते आज महाराजांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना अर्वाच्या भाषेत बोलत असल्याचे दिसून आले असल्याचे महाडिकांनी म्हटले.
सतेज पाटील एवढे मोठे झाले आहेत का तिथे आता राजघराण्यावर बोलू लागले आहेत. स्वतःच्या सत्तेसाठी छत्रपती घराण्याचा वापर करायचा आणि त्यांना असं अर्वाच्य भाषेमध्ये बोलायचं. हे सर्व आज कोल्हापूरकरांनी पाहिलं आहे आणि कोल्हापूरकर हे सहन करणार नाहीत. आज कोल्हापूर उत्तर मध्ये झालेल्या एपिसोडचे परिणाम कोल्हापूर दक्षिण, करवीर, शिरोळ, हातकणंगले या ठिकाणी दिसून येणार असून काँग्रेस-मविआच्या पाचही उमेदवारांचा सुफडा साफ होणार असल्याचे महाडिक यांनी म्हटले. काँग्रेसला आता उतरती कळा लागली असल्याचे त्यांनी म्हटले.
सतेज पाटलांचा स्वभावच कारणीभूत
धनंजय महाडिक यांनी म्हटले की, सतेज पाटलांवर ही परिस्थिती त्यांच्या स्वभाव दोषामुळे आली आहे. मी म्हणेल तोच कायदा, या कोल्हापूरचा मालक आहे, काँग्रेसचे सर्व नगरसेवक आणि कार्यकर्ते माझे नोकर आहेत. हा त्यांचा अविर्भाव होता. त्याचा फटका त्यांना बसला असून काँग्रेसने त्यांचा खरा चेहरा समोर आणला असल्याचे धनंजय महाडिकांनी म्हटले.
